• Wed. Sep 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री अंबिका विद्यालयात 139 वा कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात साजरा

ByMirror

Sep 23, 2026
श्री अंबिका विद्यालयात 139 वा कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात साजरा

भव्य कर्मवीर रथ मिरवणुकीने केडगाव परिसर दुमदुमला; पद्मश्री पोपटराव पवार, प्रा. प्रशांत खामकर यांची प्रमुख उपस्थिती


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे श्री अंबिका विद्यालय, केडगाव देवी, ता. जि. अहिल्यानगर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रम, आकर्षक कर्मवीर रथ मिरवणूक आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी संपूर्ण विद्यालय परिसर कर्मवीरमय झाला.


सकाळी ठीक 8 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांनी सजविलेल्या आकर्षक कर्मवीर रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत झांज पथक, लेझीम पथक, दांडिया पथक, झेंडा पथक, कलश पथक, वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी आदी विविध पथकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, विविध सामाजिक व शैक्षणिक संदेश देणारे फलक आणि आकर्षक कर्मवीर रथाने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.


“रयत शिक्षण संस्थेचा विजय असो!”, “कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो!” अशा घोषणांनी केडगाव परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्तबद्ध मिरवणूक आणि कर्मवीरांच्या विचारांचा जागर यामुळे वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले. यानंतर सकाळी 10 वाजता कर्मवीर जयंतीनिमित्त मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तके आवर्जून वाचावीत, असा प्रेरणादायी संदेश दिला.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रशांत खामकर यांनी आपल्या ओजस्वी, प्रभावी आणि प्रेरणादायी वाणीने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्याचा केवळ परिचय करून न देता “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” या विचारामागील व्यापक शैक्षणिक तत्त्वज्ञान, त्याग, संघर्ष, ध्येयवाद आणि समाजातील तळागाळातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याची कर्मवीरांची अखंड तळमळ प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसमोर उभा राहणारा आदर्श प्रकर्षाने जाणवला. त्यांच्या विचारांनी विद्यार्थी, शिक्षक, सेवकवर्ग आणि उपस्थित मान्यवरांच्या मनावर कर्मवीरांच्या विचारांचा ठसा उमटविला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडखे यांनी केले. त्यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करताना स्पर्धा परीक्षांमधील विद्यालयाची उल्लेखनीय प्रगती, विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या शिष्यवृत्ती, विद्यालयाची नूतन वास्तू, सेवकवर्गाचे योगदान तसेच विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी कर्मवीर अण्णांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात सातत्याने अभ्यास करून आपल्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करावी, असे आवाहन केले. कार्यक्रम प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवरावजी पांडुळे, अशोक बाबर, अनिल साळुंके, तसेच किसनराव सातपुते, महेश गुंड, रावसाहेब सातपुते, प्रशांत कोतकर, गोविंदशेठ कोतकर पोपट शेठ शिंगवी, माजी मुख्याध्यापक थोरात सर, गंगाधर लोंढे, देणगीदार भरत दळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती औटी व जयश्री भोस यांनी केले


विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी व सेवकवर्गाचे आभार मानले. कर्मवीर जयंती सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व सेवकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कर्मवीरांच्या विचारांचा जागर यामुळे 139 वा कर्मवीर जयंती सोहळा अविस्मरणीय ठरला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *