महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेतर्फे सत्कार
शैक्षणिक योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना राष्ट्रीय शिक्षक योजना एवं प्रशासन संस्थान (NIEPA) यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना, अहिल्यानगर-नाशिक विभाग यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना विविध उपक्रमांना चालना देत त्यांनी बजावलेल्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने अहिल्यानगरच्या शैक्षणिक क्षेत्रातही या पुरस्काराचे स्वागत होत आहे.
या वेळी RSP नाशिक विभागीय उपाध्यक्ष सिकंदर शेख आणि जिल्हा समादेशक प्रकाश मिंड यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक रामदास म्हस्के, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, विस्तार अधिकारी भिवसेन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिकंदर शेख म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी म्हणून संध्या गायकवाड यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्न, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित बाबींमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन दिल्ली येथे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ही प्रेरणादायी बाब आहे. आपल्या कार्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. संध्या गायकवाड यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल ही जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा समादेशक प्रकाश मिंड म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल (RSP) विभाग तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले आहे. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संबंधित उपक्रमांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते सहकार्य केले.
शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशा उपक्रमांना प्रशासकीय पातळीवर मार्गदर्शन व सहकार्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. संध्या गायकवाड यांनी या उपक्रमांकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले असून, त्यांच्या सहकार्यामुळे अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविता आले.
राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

