महिला सक्षमीकरण, गरजू मुलींची लग्ने आणि शैक्षणिक मदतीतील कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘उडाण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महिला सक्षमीकरण, गरजू मुलींच्या विवाहासाठी मदत, तंटामुक्ती तसेच वंचित घटकांतील मुलींना शैक्षणिक मदत अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
उडाण फाउंडेशन संलग्न जय असोसिएशन ऑफ एनजीओ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात देशभक्तीपर गीते, नृत्य आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू डॉ. शबनम शेख यांच्या हस्ते हेलन पाटोळे यांना राज्यस्तरीय ‘उडाण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रशांत साळुंके, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे संचालक मेहरनाथ कलचुरी, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे राज्याध्यक्ष ॲड. महेश शिंदे, उडाण फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, शासनाचा राज्य आदर्श युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, ॲड. अनिता दिघे, ॲड. दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
हेलन पाटोळे यांनी शिक्षिका म्हणून आपल्या जबाबदारीसोबतच सामाजिक कार्याचीही बांधिलकी जपली आहे. विशेषतः महिला आणि वंचित घटकांतील मुलींच्या प्रश्नांकडे त्यांनी संवेदनशीलतेने पाहत विविध प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. समाजातील गरजू व्यक्तींना आधार देण्याबरोबरच महिलांना सक्षम करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. तंटामुक्तीसाठी पुढाकार घेत समाजातील वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू मुलींच्या विवाहासाठी मदत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम तसेच गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत अशा अनेक माध्यमांतून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. विशेषतः समाजातील वंचित घटकांतील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक मदत मिळवून देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे, या कार्यामुळे पाटोळे यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर हेलन पाटोळे यांनी सामाजिक कार्य हे कोणत्याही पुरस्काराच्या अपेक्षेने केले जात नसल्याचे सांगितले. समाजातील गरजू व्यक्तीला मदत मिळाली, एखाद्या मुलीचे शिक्षण सुरू राहिले, एखाद्या कुटुंबाला अडचणीच्या काळात आधार मिळाला, यातच सामाजिक कार्याचे खरे समाधान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मिळालेला पुरस्कार हा आपल्या कार्याची दखल घेणारा असून, या सन्मानामुळे समाजासाठी आणखी जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढील काळातही महिला, मुली आणि वंचित घटकांसाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हेलन पाटोळे यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना ‘उडाण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

