• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

एकल महिला सर्वेक्षणासाठी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार

ByMirror

Sep 4, 2026
एकल महिला सर्वेक्षणासाठी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार

घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी महापालिकेला सहकार्य करणार; पात्र महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही पात्र एकल महिला शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या एकल महिला सर्वेक्षणास कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगर यांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत पंचायतच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना अधिकृत पत्र देण्यात आले आहे. शहरातील कष्टकरी, कचरा वेचक तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित महिलांशी संस्थेचा थेट संपर्क असल्याने सर्वेक्षण अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी प्रशासनासोबत प्रत्यक्ष क्षेत्रात काम करण्याची भूमिका पंचायतने घेतली आहे.


जिल्हा समन्वयक विकास भाऊसाहेब उडानशिवे यांनी सांगितले की, शहरातील एकही पात्र एकल महिला या सर्वेक्षणातून वंचित राहू नये, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. केवळ कार्यालयीन पातळीवर माहिती संकलित करून हे सर्वेक्षण पूर्ण न करता प्रत्यक्ष वस्त्या, झोपडपट्ट्या, कष्टकरी वसाहती आणि कामाच्या ठिकाणी जाऊन महिलांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत प्रशासनाला आवश्‍यक ते सर्व सहकार्य करणार आहे.


कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत ही संस्था कष्टकरी, कचरा वेचक तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित महिलांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने काम करत आहे. संस्थेच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामातून शहरातील अनेक गंभीर सामाजिक व आर्थिक समस्या समोर आल्या आहेत. आज अनेक महिला अत्यंत तरुण वयात विधवा होत आहेत. काही कुटुंबांमध्ये व्यसनाधीनतेमुळे आर्थिक परिस्थिती ढासळत असून त्याचा थेट परिणाम महिलांवर आणि त्यांच्या मुलांवर होत आहे. पतीच्या निधनानंतर अनेक 30 ते 40 वर्षांच्या महिलांवर एक-दोन मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडते. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी स्थिर उत्पन्नाचे साधन नसल्याने या महिलांसमोर मोठे संकट उभे राहते.


उदरनिर्वाहासाठी कोणताही पर्याय नसल्याने अनेक महिलांना नाईलाजाने कचरा वेचण्याच्या कामाकडे वळावे लागते. पहाटेपासून रस्त्यावर, कचराकुंड्यांजवळ तसेच शहरातील विविध भागांत कचरा गोळा करून या महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्या दिवसभर कष्ट करतात. कचरा वेचणारी महिला ही केवळ कचरा गोळा करणारी व्यक्ती नसून ती अनेक कुटुंबांची कमावती व्यक्ती, मुलांच्या भविष्याचा आधार आणि शहराच्या स्वच्छतेत महत्त्वपूर्ण योगदान देणारी कष्टकरी महिला आहे, असे उडानशिवे यांनी स्पष्ट केले.
मात्र अशा अनेक महिलांची प्रशासनाकडे अधिकृत नोंद नसण्याची शक्यता आहे. काही महिला दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे सर्वेक्षण पथक घरी पोहोचले तरी संबंधित महिला उपलब्ध नसू शकते. काही महिलांना सर्वेक्षणाची माहिती मिळत नाही, तर सामाजिक, आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे काही महिला स्वतःहून प्रशासनापर्यंत पोहोचण्यास संकोच करतात. त्यामुळे सर्वेक्षण करताना पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक व्यापक आणि प्रत्यक्ष क्षेत्राधारित पद्धतीचा अवलंब करणे आवश्‍यक असल्याचे पंचायतने म्हटले आहे.


शहरातील कष्टकरी आणि कचरा वेचक महिलांशी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा सातत्याने संपर्क असल्याने या महिलांपर्यंत प्रशासनाची माहिती पोहोचविण्यात संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनास सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करण्याची तयारी पंचायतने दर्शविली आहे. यामध्ये पात्र महिलांपर्यंत सर्वेक्षणाची माहिती पोहोचविणे, सर्वेक्षण पथकाला संबंधित महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणे, दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असलेल्या महिलांचा शोध घेणे तसेच अत्यंत गरजू आणि दुर्लक्षित महिलांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविणे, अशी कामे पंचायतच्या माध्यमातून केली जाणार आहेत.


एकल महिलांचे सर्वेक्षण हे केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरते मर्यादित न राहता त्यातून प्रत्यक्ष महिलांच्या जीवनात बदल घडवून आणणारी प्रक्रिया ठरावी, अशी पंचायतची भूमिका आहे. ‘महिला शोधा, तिची नोंद करा, तिची गरज समजून घ्या आणि तिला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून द्या’, या उद्देशाने सर्वेक्षण राबविण्यात यावे, अशी मागणी पंचायतने केली आहे. विशेषतः विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, पतीपासून विभक्त राहणाऱ्या तसेच अत्यंत गरिबीत मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलांची काळजीपूर्वक नोंद होणे आवश्‍यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या महिलांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांना आवश्‍यक त्या योजनांशी जोडण्याची गरज आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना केवळ प्रमाणपत्र किंवा नोंदणीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना आवश्‍यक त्या शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


यामध्ये सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य, आरोग्य सुविधा, निवारा, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, रोजगाराच्या संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असावा. संबंधित विभागांशी समन्वय साधून पात्र महिलांना योजनांचा लाभ मिळतो आहे की नाही, याचाही पाठपुरावा होणे आवश्‍यक असल्याचे पंचायतने नमूद केले आहे. शहरातील एकल महिलांचा शोध घेऊन त्यांची अचूक नोंद करणे ही प्रशासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अनेकदा सर्वाधिक गरजू महिला व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाहीत; त्यामुळे प्रशासनानेच त्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका प्रशासनासोबत प्रत्यक्ष क्षेत्रात काम करण्याची तयारीही पंचायतने व्यक्त केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *