लायन्स क्लब, लिओ क्लब व घर घर लंगर सेवा आणि भारतीय डाक विभागाचा पुढाकार
‘दिल से सरहद तक’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक राखीसोबत जवानांना मिळणार शुभेच्छा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या वीर जवानांप्रती रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त कृतज्ञता, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये राबविण्यात आलेल्या ‘दिल से सरहद तक’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर शहर व परिसरातील बहिणी, नागरिक, सामाजिक संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांनी प्रेमाने उपलब्ध करून दिलेल्या तब्बल 3 हजार राख्या भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी पोस्टाने रवाना केल्या.
लायन्स क्लब, लिओ क्लब आणि घर घर लंगर सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, नागरिक, व्यक्ती तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राख्या उपलब्ध करून दिल्या. अहिल्यानगरमधील बहिणींनी प्रेमाने तयार केलेल्या या राख्या आता देशाच्या विविध सीमांवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचणार आहेत.
देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहून जवान अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. बर्फाच्छादित प्रदेश असो, कडाक्याची थंडी असो किंवा प्रखर उन्हाचा सामना असो, प्रतिकूल हवामानातही जवान देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक जवान आपल्या बहिणींपासून दूर असतात. त्यामुळे या जवानांना आपल्या बहिणींच्या प्रेमाची आणि आपुलकीची जाणीव व्हावी, तसेच ‘देशवासीय आपल्या सोबत आहेत, आपण एकटे नाही’ असा भावनिक संदेश मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाठविण्यात आलेल्या प्रत्येक राखीसोबत जवानांसाठी शुभेच्छा संदेशही पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राखीच्या माध्यमातून केवळ बहीण-भावाचे नातेच नव्हे, तर देशवासीय आणि देशरक्षक जवान यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लायन्सचे सचिव हरीश हरवानी, प्रकल्प प्रमुख प्रणिता किरण भंडारी, डॉ. सिमरन वधवा, प्रिया मुनोत, श्रेया मुनोत, सीए शंकर अंदानी, सिमा अंदानी, लिओ क्लबचे सचिव रित जाजू, गुरनूर वधवा, मधू भंडारी, डॉ. आरती डहाळे, आरती कटारिया, लाड सुवर्णकार पतसंस्थेचे अध्यक्ष समीर खेडकर यांच्यासह पोस्ट विभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक (उत्तर) रवीकुमार झावरे, दीपक नागपुरे, सुखदेव पालवे, पोस्टमन संचिता गाडे आदी उपस्थित होते. सदर राख्या जवानांना पाठविण्यासाठी पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.
प्रास्ताविक करताना सीए शंकर अंदानी म्हणाले की, सामान्यतः रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची, सुख-समृद्धीची प्रार्थना करते. मात्र देशाच्या सीमेचे रक्षण करणारे हजारो जवान आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून मातृभूमीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी सेवा करणाऱ्या या जवानांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. त्यांनाही रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींच्या प्रेमाची अनुभूती मिळावी आणि ‘आपण एकटे नाही’ असा आपुलकीचा संदेश मिळावा, हा ‘दिल से सरहद तक’ उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सिमरन वधवा म्हणाल्या की, रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाची भावना व्यक्त करणारा सण आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या जवानांपर्यंत अहिल्यानगरच्या बहिणींचे प्रेम राखीच्या माध्यमातून पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. जवानांसाठी पाठविण्यात येणारी प्रत्येक राखी त्यांच्या मनात देशवासीयांविषयीचा आत्मीयतेचा भाव अधिक दृढ करेल, असे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे म्हणाले की, अहिल्यानगरच्या बहिणी जवानांसाठी राखीच्या माध्यमातून संवेदना, प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहेत. या उपक्रमातून देशप्रेमाची भावना व्यक्त होत असून, देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती नागरिकांच्या मनात असलेला आदर आणि कृतज्ञता दिसून येते. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून या राख्या देशाच्या सीमेवर तैनात जवानांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला सामाजिक संस्था, नागरिक, महिला, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांनीही विशेष उत्साहाने राख्या उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे ‘दिल से सरहद तक’ हा उपक्रम केवळ राख्या पाठविण्यापुरता मर्यादित न राहता देशाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी लोकचळवळ ठरली. या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजीतसिंग वधवा, सतीश बजाज, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, किशोर रंगलानी, संदेश कटारिया, यांनी विशेष परिश्रम घेतले.

