“गीताला विरोध नाही; विशिष्ट धार्मिक प्रतीकांची सक्ती धर्मनिरपेक्ष भारताला अमान्य”
पीपल्स हेल्पलार्इन व भारतीय जनसंसदचे स्पष्टीकरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या पहिल्या दोन सर्वसमावेशक कडव्यांऐवजी संपूर्ण सहा कडव्यांना अधिकृत शासकीय स्वरूप देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘तिरंगा धारणालय सत्याग्रह’ करण्यात येणार आहे.
“हे आंदोलन ‘वंदे मातरम’च्या विरोधात नाही, तर स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या गीताचा गौरवशाली, सर्वधर्मसमभावी आणि सर्व भारतीयांना जोडणारा राष्ट्रीय आत्मा जपण्यासाठी आहे,” अशी भूमिका आयोजकांनी स्पष्ट केली आहे.
केंद्र सरकारच्या 2026 मधील अधिकृत निर्देशांमध्ये ‘वंदे मातरम’ची सहाही कडवी समाविष्ट करण्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. पहिल्या दोन कडव्यांमध्ये भारतभूमीचे पाणी, शेती, निसर्गसौंदर्य, समृद्धी आणि मातृप्रेम यांचे सार्वत्रिक चित्रण आहे. मात्र पुढील कडव्यांमध्ये दुर्गा, कमला, वाणी तसेच मंदिरातील प्रतिमांसारखे विशिष्ट धार्मिक संदर्भ येतात. संपूर्ण रचनेचा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा म्हणून आदर राखत असतानाच, या धार्मिक प्रतिमांना शासकीय राष्ट्रीय विधीचा सक्तीचा भाग बनविणे हे धर्मनिरपेक्षता, विवेकस्वातंत्र्य आणि समान नागरिकत्वाच्या घटनात्मक मूल्यांशी विसंगत असल्याची आंदोलकांची भूमिका आहे.
रवींद्रनाथ टागोरांनी ‘वंदे मातरम’ला चाल दिली आणि 1896च्या काँग्रेस अधिवेशनात हे गीत गायले होते. पुढे 1937मध्ये सार्वजनिक राष्ट्रीय गायनासाठी पहिल्या दोन कडव्यांचे समर्थन करण्यात आले होते. भारतातील विविध धर्मसमूहांना राष्ट्रीय प्रवाहात समानतेने सामावून घेण्याच्या दृष्टीने ही भूमिका महत्त्वपूर्ण होती, असे संघटनांनी म्हटले आहे. “हा निर्णय राष्ट्रगीताचा अवमान नसून राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वसमावेशकतेचा विचार करणारा विवेकपूर्ण दृष्टिकोन होता,” असेही आयोजकांनी स्पष्ट केले.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, तिरंग्यातील भगवा लोकभक्तीचे, पांढरा ज्ञानभक्तीचे, हिरवा कर्मभक्तीचे प्रतीक आहे, तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता आणि कायद्याच्या राज्याची आठवण करून देते. तिरंगा कोणत्याही एका धर्माचा नसून प्रत्येक भारतीयाचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्रतीकांमध्ये समता, बंधुता आणि सर्वसमावेशक नागरिकत्वाचा आत्मा कायम राहिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने राष्ट्रीय व शासकीय कार्यक्रमांसाठी ‘वंदे मातरम्’ची पहिली दोन सर्वसमावेशक कडवी अधिकृत ठेवावीत, उर्वरित कडव्यांचा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा म्हणून सन्मान करावा; मात्र त्यांचे गायन कोणावरही सक्तीचे करू नये, 2026च्या सहा कडव्यांच्या अधिकृत निर्देशांचा घटनात्मक पुनर्विचार करावा, नागरिकांच्या धर्मस्वातंत्र्याचा आणि विवेकस्वातंत्र्याचा पूर्ण सन्मान राखावा, राष्ट्रीय प्रतीकांविषयी निर्णय घेताना सर्व धर्म, भाषा आणि संस्कृतींच्या प्रतिनिधींशी सार्वजनिक चर्चा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद 51-अमध्ये राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करण्याबरोबरच धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक विविधतेपलीकडे बंधुभाव वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध संमिश्र संस्कृतीचे जतन करण्याचे मूलभूत कर्तव्य अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्रतीके ही विभाजनाची नव्हे, तर प्रत्येक भारतीयाला समानतेने जोडणारी असली पाहिजेत, असे संघटनांनी म्हटले आहे. या सत्याग्रहासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

