• Fri. Aug 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जय हिंद फाऊंडेशनचे कोल्हारच्या जिल्हा परिषद शाळेत 25 वृक्षांचे रोपण

ByMirror

Aug 13, 2026
जय हिंद फाऊंडेशनचे कोल्हारच्या जिल्हा परिषद शाळेत 25 वृक्षांचे रोपण

विद्यार्थ्यांनी घेतली संवर्धनाची जबाबदारी; शालेय परिसर हिरवाईने फुलविण्याचा निर्धार


जय हिंद फाऊंडेशनने वृक्षक्रांतीची चळवळ उभी केली -ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची चळवळ प्रभावीपणे राबविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात 25 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करून केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थी व शिक्षकांनी स्वीकारली. त्यामुळे शालेय परिसर भविष्यात हिरवाईने नटविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.


वृक्षारोपण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती निर्माण झाली. झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून मानवाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी अत्यावश्‍यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमासाठी ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री, प्रा. प्रेमकुमार पालवे, सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, कारभारी गर्जे, सदस्य ईश्‍वर पालवे, माजी मुख्याध्यापक नामदेव जावळे, ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव पालवे गुरुजी, किशोर पालवे, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, दिनकर पालवे, अशोक जावळे, निवृत्त अधिकारी भगवान पालवे, आजिनाथ पालवे, कारभारी जावळे, आनंदा गायकवाड, एकनाथ पालवे, निवृती पालवे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसंगे, बजरंग बांदल, सुरेश कोळगे, सुजाता वाळुंज, वैशाली कदम, जयश्री भापकर आदी उपस्थित होते.


यावेळी ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविण्याबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्षक्रांतीची चळवळ उभी राहिली असून, हजारो झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.
ते पुढे म्हणाले, आजच्या काळात वाढते प्रदूषण, बदलते हवामान, कमी होत चाललेली वनसंपदा आणि पाण्याची समस्या यांचा विचार करता प्रत्येक गावाने वृक्षसंवर्धनाचा संकल्प करणे गरजेचे आहे. एक व्यक्ती, एक कुटुंब आणि एक शाळा जर काही झाडांची जबाबदारी घेऊन ती जगविण्यासाठी पुढाकार घेईल, तर पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. प्रेमकुमार पालवे यांनी सांगितले की, माजी सैनिक शिवाजी पालवे यांच्या पुढाकारातून कोल्हार परिसरात यापूर्वीही हजारो झाडांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षारोपणासोबतच त्यांचे संवर्धन करण्यावरही भर दिला जात असून, पर्यावरण रक्षणाचे उत्तम कार्य गावात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व समजून घेत प्रत्येक रोपाची निगा राखण्याचा संकल्प केला. भविष्यात या परिसरात आणखी वृक्षलागवड करून शाळेला हिरवाईचे केंद्र बनविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार आजिनाथ पालवे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *