• Wed. Aug 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

800 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; 5 हजार 555 रोपांचा महासंकल्प!

ByMirror

Aug 11, 2026
“आज झाडे जपली तरच उद्या सावलीचा मेवा मिळेल!” -नितीन शेलार

बजरंग विद्यालयातून हरितक्रांतीची हाक; शिवगामिनी फाउंडेशनच्या वृक्षसंवर्धन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


“आज झाडे जपली तरच उद्या सावलीचा मेवा मिळेल!” -नितीन शेलार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “आपल्या वॉटर बॅगमधील उरलेले पाणी झाडांना टाका. घरातील महत्त्वाच्या वस्तू जशा आपण जपतो, तशीच झाडांचीही काळजी घेतली पाहिजे. आज आपण झाडे जपली, तरच भविष्यात आपल्याला सावली मिळणार आहे,” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश माजी नगरसेवक नितीन शेलार यांनी दिला.
सावेडी येथील जय बजरंग प्राथमिक विद्यालयात शिवगामिनी फाउंडेशनच्या वतीने पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ग्रीन सिटी अभियानांतर्गत सावलीदार वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयातील तब्बल 800 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ‘ग्रीन सिटीग्रीन आर्मी’ची शपथ घेत वृक्षरक्षणाचा निर्धार केला. यावेळी शेलार बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविकात शिवगामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. गायत्री गुंड पाटील यांनी फाउंडेशनच्या आगामी पर्यावरण अभियानाची माहिती देताना सांगितले की, “क्रांती दिनाच्या निमित्ताने हरितक्रांती आणण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील सहा शाळांमध्ये तब्बल 5 हजार 555 रोपांचे वितरण करण्यात येणार आहे. पुढील क्रांती दिनापर्यंत शहरातील सावलीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसेल, असा आमचा संकल्प आहे.”या संकल्पामुळे वृक्षारोपणापासून वृक्षसंवर्धनाकडे जाणाऱ्या व्यापक अभियानाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना लावलेल्या प्रत्येक रोपाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. “वृक्षारोपण करणे ही सुरुवात आहे; मात्र रोप जगवणे ही खरी पर्यावरणसेवा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या झाडाची नातेवाईकाप्रमाणे काळजी घ्यावी,”असे त्यांनी सांगितले. ॲड. महेश शिंदे यांनी शिवगामिनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, “वृक्षसंवर्धनातूनच आपले जीवन आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे,” असे सांगितले. प्रा. डॉ. रमेश वाघमारे यांनी वृक्षांचे इकेगाई’ स्पष्ट करताना मानवी जीवनातील वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले.


प्रमुख अतिथी, शिक्षक, पालक आणि 800 विद्यार्थ्यांना ‘ग्रीन सिटीग्रीन आर्मी’ची शपथ देण्यात आली. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यालय परिसरात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष, एक जबाबदारी’ हा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमास ॲड. महेश शिंदे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, ॲड. रजनी ताठे, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, शिवगामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. गायत्री गुंड पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पालक महिला प्रतिनिधी म्हणून सौ.रमा भैरी, वैशाली शिंदे, वैशाली वारे, सुमन शेवाळे, वैशाली मिसाळ आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. पूजा बनकर, रोहित पुंडे, अभिजीत कांबळे, ॲड. दिनेश शिंदे आणि ॲड. आरती शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले, तर ॲड. मेहूल गांधी यांनी आभार मानले.


–—
शाळेच्या अंगणातून शहराच्या हरित भविष्याकडे!
5 हजार 555 रोपे, 6 शाळा आणि हजारो विद्यार्थ्यांचा हरितसंकल्प या माध्यमातून शिवगामिनी फाउंडेशनने वृक्षारोपणाला जनचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बजरंग विद्यालयातून सुरु झालेला हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम न राहता “झाड लावा, झाड जगवा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सावली निर्माण करा”या संदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणारा ठरणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *