• Mon. Aug 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय आवारी; व्हाईस चेअरमनपदी संतोष जायभाय

ByMirror

Aug 9, 2026
दोन्ही पदांवर बिनविरोध निवड; विकास पॅनलच्या एकजुटीचा जल्लोष

दोन्ही पदांवर बिनविरोध निवड; विकास पॅनलच्या एकजुटीचा जल्लोष


सभासद हिताला प्राधान्य देत व्याजदर आणखी कमी करण्याचा प्रयत्न -किशोर गांगर्डे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठीची निवड प्रक्रिया शनिवारी (दि. 8 ऑगस्ट 2026) पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय सुदाम आवारी तर व्हाईस चेअरमनपदी संतोष सुभाष जायभाय यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली.


जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक किरण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी दत्तात्रय सुदाम आवारी यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला किशोर गांगर्डे हे सुचक तर सुरेश ढोमसे हे अनुमोदक होते. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी संतोष सुभाष जायभाय यांनी एकमेव अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला दिपक वाघ हे सुचक तर संदिप शेरकर हे अनुमोदक होते.


दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने किरण आव्हाड यांनी चेअरमनपदी दत्तात्रय सुदाम आवारी आणि व्हाईस चेअरमनपदी संतोष सुभाष जायभाय यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन दत्तात्रय आवारी व व्हाईस चेअरमन संतोष जायभाय यांचा विकास पॅनलचे अध्यक्ष किशोर गांगर्डे, मावळते चेअरमन जगदीश वाघ व मावळते व्हाईस चेअरमन किशोर सांगळे यांनी सत्कार केला. यावेळी संचालक मंडळाने विकास पॅनलचा एकच जयघोष करत जल्लोष केला.


निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या कामकाजाबाबत संचालक मंडळातील काही सदस्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी पॅनलचे अध्यक्ष तथा संचालक किशोर गांगर्डे, संचालक अशोक राशिनकर, दिपक वाघ, रविंद्र यादव, महेश भावसार, सुरेश ढोमसे, देविदास शेटे, संदीप शेरकर, संचालिका अमृता पोळ, विशाल सरोदे, रामदास पालवे, महिला संचालिका अर्चना गायकवाड, प्रियंका मिसाळ, संचालक संदिप पवार, अरविंद वाव्हळ, संभाजी निमसे, तज्ञ संचालक ज्ञानदेव लोणारे व हरिशचंद्र पुजारी, मा.चेअरमन भानुदास कल्हापुरे, मा.चेअरमन बाळकृष्ण काळे, मा. चेअरमन दत्तात्रय गडाख मा.चेअरमन सर्जेराव ठोंबरे, मा. चेअरमन आवारी, मा. संचालक सुदाम गावडे, माणिक धनगर आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद परदेशी उपस्थित होते.


विकास पॅनलचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांनी नवनिर्वाचित चेअरमन दत्तात्रय आवारी व व्हाईस चेअरमन संतोष जायभाय यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था ही सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणारी जिल्ह्यातील संस्था आहे. मावळते चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी उत्तमपणे काम केले आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक सुरू असून, मधील काळात इतर काही व्यक्तींनी चुकीची कामे केली. त्या चुकीच्या कामांना व विरोधकांना या एकजुटीतून बिनविरोध झालेल्या निवडीने सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.


सभासद हिताचा कारभार सुरू असून, सभासद हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. आणखी व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संस्थेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या ठेवी जमा झाल्या आहेत. एका दिवसात श्रीगोंदा शाखेने 1 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या, तर शेवगाव शाखेने यापूर्वी 50 लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. संचालक मंडळाने सभासदांचा विश्‍वास संपादन केला असून, त्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही किशोर गांगर्डे यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित चेअरमन दत्तात्रय सुदाम आवारी यांनी सर्व संचालकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल आभार व्यक्त केले. सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. सभासद हिताचे निर्णय घेऊन संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन संतोष सुभाष जायभाय म्हणाले की, अचानकपणे व्हाईस चेअरमनची जबाबदारी देऊन संचालक मंडळाने माझ्यावर मोठा विश्‍वास टाकला आहे. कुकडीला न्याय देण्यासाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संस्थेचे उत्कृष्टपणे कामकाज सुरू राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपस्थित संचालकांनी संस्थेच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केली. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेचा कारभार अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची भूमिका संचालक मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *