पाथर्डी, राहुरी, कोपरगाव व नगर शहरात संघटनात्मक विस्ताराला बळ; महिला आघाडी अधिक सक्षम करण्याचा निर्धार
ताई पगारे यांची कोपरगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
महिलांनी राजकीय सक्षमीकरणासाठी सक्रिय व्हावे -ज्योतीताई पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी सुरु असलेल्या पक्ष बांधणी उपक्रमातंर्गत पाथर्डी, राहुरी, कोपरगाव तसेच नगर शहरातील महिलांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील महिला आघाडीला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची भूमिका रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के आणि महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पवार यांनी मांडली.
पक्षात प्रवेश करणाऱ्या महिलांचे स्वागत करून रिपार्इच्या वतीने सत्कार करण्यात आला. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्धार यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या महिलांनी व्यक्त केला. या प्रवेश कार्यक्रमात ताई पगारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ताई पगारे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यात पक्षाची महिला आघाडी अधिक मजबूत करून गावागावात पक्षाची शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
भारती गव्हाळे, ऋतुजा गव्हाळे, सोनाली बळीद, रीना पाटोळे, रेश्मा जाधव आणि प्रियंका पठारे यांनी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)मध्ये प्रवेश केला. पक्षात नव्याने दाखल झालेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी सारिका साळवे, विश्रांती पठारे, संपदा म्हस्के, शीतल नाटिकर, संगीता पाटोळे, गुलाम शेख, विजय शिरसाठ, नईम शेख, लकी वाघमारे, योहान चाबुकस्वार, स्वप्नील साठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात पक्षाची विचारधारा, सामाजिक बांधिलकी, सामाजिक न्याय, समता आणि महिलांचे राजकीय सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी केवळ सामाजिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची वाटचाल ही सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठीची आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटन मजबूत असणे आवश्यक आहे. महिलांचा सक्रिय सहभाग हा कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय संघटनेच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी करताना महिला आघाडीला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पवार म्हणाल्या की, रिपब्लिकन पक्षाची भूमिका समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची आहे. ही भूमिका घराघरात आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महिला कार्यकर्त्यांनी करावे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून समाजाच्या परिवर्तनात त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कार्य करीत आहेत. मात्र, राजकीय निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग आणखी वाढण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन संघटनात्मक आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्याचे आवाहन केले.

