आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी भव्य रॅली; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरच्या वतीने रविवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सावेडी उपनगरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य रॅली आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाची परंपरा, सांस्कृतिक वारसा, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि समाजाच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाचे निसर्गसंवर्धनातील योगदान, त्यांची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि जागतिक स्तरावरील महत्त्व लक्षात घेऊन 9 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांनी सांगितले की, आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून जंगल, जल, जमीन आणि पर्यावरणाशी त्याचे अतूट नाते आहे. पृथ्वीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवामध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा, लोककला, इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान, तसेच आदिवासी समाजाचे हक्क, अधिकार आणि विविध प्रश्न यांवर विशेष भर दिला जाणार आहे.
रविवारी सकाळी प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य सांस्कृतिक मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, भिस्तबाग महाल मार्गे श्रेयस लॉनपर्यंत काढण्यात येणार आहे.
मिरवणुकीत आदिवासी युवक-युवती पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार असून, आदिवासी संस्कृतीची झलक सादर करणारे कमाडावना नृत्य, टिपऱ्या नृत्य, कांबड लोकनृत्य, फुगडी आणि इतर पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच आदिवासी सांस्कृतिक गीतांचे सादरीकरण आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणार आहे.
मिरवणुकीचा समारोप भिस्तबाग महाल शेजारील श्रेयस लॉन येथे होईल. त्यानंतर सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरण, व्याख्याने आणि समाजप्रबोधनपर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आदिवासी सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यास महानगरपालिका उपायुक्त एस. बी. तडवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात शिक्षण, क्रीडा, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य, युवक-युवती आणि समाजबांधव परिश्रम घेत असून, शासकीय आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहाचेही विशेष सहकार्य लाभत आहे.

