• Thu. Aug 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्सच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत रंगला चुरशीचा थरार

ByMirror

Aug 5, 2026
फिरोदिया शिवाजियन्सच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत रंगला चुरशीचा थरार

सेंट मायकल स्कूलची विजयी घोडदौड; आर्मी स्कूल आणि ऑर्चिड स्कूलचेही दमदार विजय


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) विविध वयोगटांतील सामने अत्यंत चुरशीचे आणि रंगतदार झाले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत आर्मी स्कूल, ऑर्चिड स्कूल आणि सेंट मायकल स्कूलच्या संघांनी दमदार कामगिरी करत विजय मिळवला. तर 16 वर्षांखालील मुलांच्या गटातील सेंट मायकल व तक्षिला स्कूल यांच्यातील सामना अखेर 2-2 अशा बरोबरीत सुटल्याने उपस्थित प्रेक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचकारी फुटबॉलचा अनुभव मिळाला.


सकाळच्या सत्रात 16 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी स्कूल (एमआयसी ॲण्ड एस) आणि ऊर्जा गुरुकुल यांच्यात सामना झाला. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला पलक सोनानिया हिने आर्मी स्कूलसाठी गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आर्मी स्कूलच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत ऊर्जा गुरुकुलला अखेरपर्यंत एकही गोल करू दिला नाही. त्यामुळे आर्मी स्कूलने 1-0 अशा फरकाने विजयाची नोंद केली.


14 वर्षांखालील मुलांच्या गटात जेएसएस गुरुकुल आणि ऑर्चिड स्कूल यांच्यातील सामना जेएसएस गुरुकुलचे खेळाडू नियोजित वेळेत मैदानावर उपस्थित न राहिल्याने खेळविण्यात आला नाही. नियमानुसार ऑर्चिड स्कूलला विजयी गुण प्रदान करण्यात आले.


16 वर्षांखालील मुलांच्या गटात ज्ञानसंपदा स्कूल आणि ऑर्चिड स्कूल यांच्यात अत्यंत रंगतदार सामना झाला. सामना शेवटपर्यंत अटीतटीचा राहिला. 21 व्या मिनिटाला मोक्ष गरदास याने गोल करत ज्ञानसंपदा स्कूलला आघाडी मिळवून दिली. मात्र ऑर्चिड स्कूलने जोरदार पुनरागमन केले. 30 व्या मिनिटाला पार्श बंब याने गोल करत सामना बरोबरीत आणला, तर 33 व्या मिनिटाला पुन्हा गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. ज्ञानसंपदा स्कूलला आणखी गोल करू न देता ऑर्चिड स्कूलने 2-1 अशा फरकाने शानदार विजय मिळवला.


दुपारच्या सत्रात 12 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल स्कूल आणि तक्षिला स्कूल यांच्यात सामना झाला. सेंट मायकल स्कूलच्या सारांश बोरा याने 19 व्या मिनिटाला, तर युग कांकरिया याने 25 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तक्षिला स्कूलला एकही गोल करण्याची संधी न देता सेंट मायकल स्कूलने 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटातही सेंट मायकल स्कूलने आपला विजयी झेंडा कायम राखला. तक्षिला स्कूलविरुद्धच्या सामन्यात 21 व्या मिनिटाला शौर्य चंगेडिया याने पहिला गोल केला. त्यानंतर 30 व्या मिनिटाला अनिश झांजे याने आणखी एक गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. उत्कृष्ट बचावाच्या जोरावर तक्षिला स्कूलला एकही गोल करू न देता सेंट मायकल स्कूलने 2-0 असा विजय संपादन केला.


दिवसातील सर्वाधिक रोमांचक सामना 16 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल स्कूल आणि तक्षिला स्कूल यांच्यात झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. 7 व्या मिनिटाला अरहान गुगळे याने सेंट मायकल स्कूलसाठी पहिला गोल केला. त्यानंतर 21 व्या मिनिटाला सुरज शेळके याने गोल करून संघाला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. मात्र तक्षिला स्कूलने हार न मानता जोरदार पुनरागमन केले. 42 व्या मिनिटाला गौरव लिलावत याने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सेंट मायकल स्कूलचा खेळाडू दक्ष कुलकर्णी याच्याकडून झालेल्या दुर्दैवी सेल्फ गोलमुळे तक्षिला स्कूलला आणखी एक गुण मिळाला आणि अखेर हा रोमांचकारी सामना 2-2 अशा बरोबरीत संपला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *