नागरिकांना भंडाऱ्याचे वाटप; उपक्रमाचे पाचवे वर्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असली, तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात समाजोपयोगी पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सर्जेपूरा चौक रिक्षा स्टॉपच्या वतीने महाप्रसाद वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते.
अण्णाभाऊंना आदरांजली अर्पण करुन रिक्षाचालकांनी स्वखर्चाने आणि लोकसहभागातून भंडाऱ्याचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगरचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या न्याय, सन्मान आणि हक्कांसाठी वाहिले. त्यांच्या विचारांचा खरा वारसा जपायचा असेल, तर जयंती केवळ औपचारिक कार्यक्रमांनी नव्हे, तर अन्नदान, समाजसेवा आणि गरजूंना मदतीचा हात देऊन साजरी केली पाहिजे. सर्जेपुरा चौकातील रिक्षाचालकांनी सलग पाचव्या वर्षी अन्नदानाचा उपक्रम राबवून अण्णाभाऊंना कृतीतून खरी आदरांजली वाहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन बाळू खुडे, मनोहर चाखले, सागर खुडे व विकी चव्हाण यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी नितीन अशोक पवार, संतोष भोसले, सोमनाथ लोखंडे, समीर सय्यद यांच्यासह सर्जेपुरा चौकातील अनेक रिक्षाचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षाचालक, असंघटित कामगार आणि नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी हा उपक्रम राबविला. पुढील वर्षी हा उपक्रम आणखी व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

