• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरुपौर्णिमेनिमित्त सनबीम्स प्री-प्रायमरीची रंगली संस्कारमय बालदिंडी

ByMirror

Jul 30, 2026
गुरुजनांविषयी कृतज्ञता, भारतीय संस्कृतीची ओळख आणि संस्कारांचा उपक्रम

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘विठ्ठल… विठ्ठल…’चा अखंड नामघोष; चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष


गुरुजनांविषयी कृतज्ञता, भारतीय संस्कृतीची ओळख आणि संस्कारांचा उपक्रम


अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि गुरुजनांविषयी आदरभाव रुजविण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमा निमित्त संस्कारमय बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.


भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोच्च स्थान असून, विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचे महत्त्व लहानपणापासूनच रुजावे तसेच गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते कर्नल परब स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), गीता दिलीप परब, यांचे विधिवत गुरुपूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.


शिलाविहार रोड येथील सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेपासून बालदिंडीला उत्साहात प्रारंभ झाला. दिंडीने परिसरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत प्रस्थान केले. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. हातात टाळ, मृदंग आणि भगवे पताके घेऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘विठ्ठल… विठ्ठल…’ अशा नामघोषात विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगविला. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.


या दिंडीत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. चिमुकल्यांचा निरागस उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दिंडीमुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, भक्ती, गुरु-शिष्य नाते आणि भारतीय संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

यावेळी सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना योगेश शिंगवी म्हणाल्या, “आई-वडील हे प्रत्येक मुलाचे पहिले गुरु असतात. त्यानंतर शिक्षक मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देतात. लहान वयातच चांगले संस्कार, गुरुजनांविषयी आदर आणि भारतीय संस्कृतीची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे भावी पिढी सुसंस्कृत, सक्षम आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडण्यास निश्चितच मदत होईल. गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच भारतीय संस्कृती व अध्यात्माची ओळख व्हावी, या उद्देशाने या बालदिंडीचे आयोजन करण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.
या दिंडीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *