सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त औसरकर मळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकडा भजन व महाआरतीने झाली. त्यानंतर भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत हरिनामाचा गजर करत भक्तिभाव व्यक्त केला. दुपारी श्री विठ्ठल-रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या सहभागाने रंगलेल्या भजन कार्यक्रमाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. पारंपरिक पांढऱ्या साड्यांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर मंदिरातून भव्य पायी दिंडीला प्रारंभ झाला. गोरव नगर, चिपाडे मळा, ओम कॉलनी, औसरकर मळा आणि नानाजी नगर या मार्गाने दिंडीची भक्तिमय मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि हरिनामाच्या घोषात शेकडो वारकरी, महिला, पुरुष तसेच तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला. परिसरातील नागरिकांनीही या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांचे स्वागत केले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी माजी नगरसेविका शितलताई जगताप यांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत दिंडी सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. त्यांनी उपस्थित भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. दिंडी मंदिरात परतल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या सौ अनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी युवा प्रतिष्ठान यांनी या दिंडी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते. वारकरी परंपरा, भक्ती, सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचा संदेश देणारा आषाढी एकादशीचा हा दिंडी सोहळा परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी उपस्थित सर्व भाविक, वारकरी आणि नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

