मासूम संस्थेकडून करिअर मार्गदर्शन, गरजवंत विद्यार्थ्यांना पाच सायकली भेट; निवृत्त जिल्हा न्यायाधीशांकडून पुस्तके व आर्थिक मदत
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा; रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवसभर कष्ट करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळावी, शिक्षणासोबत रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधींची माहिती व्हावी या उद्देशाने हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘करिअरची वारी’ या अनोख्या संकल्पनेतून करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्याधारित प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगाराच्या मार्गांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मासूम संस्थेच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना पाच सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश चंद्रचूड गोंगले यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी स्पर्धा परीक्षा व अवांतर वाचनाची उपयुक्त पुस्तके भेट देण्याबरोबरच शाळेसाठी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. या कार्यक्रमास मासूम संस्थेचे प्रोग्राम हेड अमर डावल (मुंबई), रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, इंडियन अकॅडमी ऑफ फॅशन डिझायनिंगच्या संचालिका रचना काकडे, मिटकॉनचे सागर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, दहावी-बारावीनंतर करिअरचे स्पष्ट ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाची पदवी महत्त्वाची असली तरी प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता आणि कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरते. “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एखादी कला, गुण किंवा विशेष क्षमता दडलेली असते. त्या क्षमतेची ओळख करून तिचा विकास केल्यास यश निश्चित मिळते. मासूम संस्था केवळ करिअर मार्गदर्शनच करत नाही, तर व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि विविध प्रकारचे सहकार्यही करते. विद्यार्थ्यांनी या संधींचा नक्की लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्राचार्य सुनील सुसरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, करिअर नियोजन आणि कौशल्यविकासावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मासूम संस्थेचे प्रोग्राम हेड अमर डावल यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधी, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या पर्यायांबाबत मार्गदर्शन केले. मासूम संस्था शिक्षण अर्धवट सोडलेल्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही. कौशल्य, सातत्य, आत्मविश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान यांची जोड असेल तर कोणताही विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. स्वतःच्या आवडीचा आणि क्षमतेला साजेसा व्यवसाय किंवा करिअर निवडल्यास आयुष्यात समाधान आणि यश दोन्ही मिळते.” त्यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध कौशल्य विकास योजना, शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या संधींचाही लाभ घेण्याचे आवाहन केले.
इंडियन अकॅडमी ऑफ फॅशन डिझायनिंगच्या संचालिका रचना काकडे यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी, उद्योजकता आणि सर्जनशीलतेला मिळणारे व्यासपीठ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर मिटकॉनचे सागर गायकवाड यांनी नर्सिंग असिस्टंट, सोलर सिस्टिम टेक्निशियन यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती देत कमी कालावधीत कौशल्य आत्मसात करून चांगल्या उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सांगितले.
सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश चंद्रचूड गोंगले यांनी दिवसभर काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची वाट सोडू नका. वाचनाची सवय, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्य या गुणांच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मासूम संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने विविध शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांचा लाभ मिळत असल्याबद्दल संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, संचालक कमलाकर माने आणि युवराज बोराडे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश भुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळू गोरडे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

