‘कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये’ -ॲड. आर. टी. शर्मा
नवीन गणवेशाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून आर्थिक परिस्थिती ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नये, या भावनेतून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले ॲड. आर. टी. शर्मा यांनी जानकीबाई आपटे बालिकाश्रम संस्था संचलित माणिकताई करंदीकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच बालिकाश्रम बालक मंदिर प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मोफत शालेय गणवेश उपलब्ध करून दिले.
या गणवेश वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. निरज करंदीकर होते. संस्थेच्या सचिव दीप्ती करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. आर. टी. शर्मा तसेच रेसिडेन्शियल हायस्कूलचे पर्यवेक्षक शरद सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
यावेळी बोलताना ॲड. आर. टी. शर्मा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करत समाजातील सक्षम घटकांनी गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षण हा समाजपरिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असते; मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षणात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हे समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे. शालेय गणवेश हा केवळ पोशाख नसून विद्यार्थ्यांमध्ये समानता, आत्मविश्वास आणि शिस्तीची भावना निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
डॉ. निरज करंदीकर म्हणाले की, संस्थेची स्थापना ही समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या ध्येयाने झाली आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. ॲड. आर. टी. शर्मा यांनी दिलेले सहकार्य हे केवळ गणवेश वाटप नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर व्यक्त केलेला विश्वास आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मक संदेशही जात असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव दीप्ती करंदीकर यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक योगदान देण्याची गरज व्यक्त करुन उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल सुद्रीक यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक रामदास शिंदे यांनी केले. तर आभार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाहेदा पठाण यांनी मानले.

