• Sun. Jul 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय’ -सुभाष लांडे (भाकपचे राज्य सचिव)

ByMirror

Jul 26, 2026
NEET पेपरफुटी विरोधी आंदोलनाला यश; लोकशाहीप्रेमी जनता आणि विद्यार्थी संघटनांचे अभिनंदन

NEET पेपरफुटी विरोधी आंदोलनाला यश; लोकशाहीप्रेमी जनता आणि विद्यार्थी संघटनांचे अभिनंदन


जंतर-मंतरवरील 28 दिवसांच्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागल्याचा दावा; कॉकरोच जनता पार्टी व डाव्या विद्यार्थी-युवक संघटनांना ‘क्रांतिकारी लाल सलाम’


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला त्यांनी देशातील तरुणाईच्या संघर्षाचा आणि लोकशाहीप्रेमी जनतेच्या एकजुटीचा मोठा विजय असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राज्य सचिव सुभाष लांडे यांनी म्हंटले आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाच्या यशाबद्दल लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


सुभाष लांडे यांनी म्हंटले आहे की, जंतर-मंतर येथे सलग 28 दिवस सुरू असलेल्या आंदोलनात देशभरातील युवकांनी संयम, जिद्द आणि संघर्षशील वृत्तीचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर सी जे पी ने उभारलेल्या या आंदोलनाला विविध डाव्या पक्षांच्या विद्यार्थी-युवक संघटना, सामाजिक संघटना आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी पाठिंबा दिला. या व्यापक जनसमर्थनामुळे सरकारला अखेर माघार घ्यावी लागल्याचा दावा त्यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, आंदोलनादरम्यान झालेल्या कथित दडपशाहीला न जुमानता युवकांनी लोकशाही मार्गाने आपला लढा कायम ठेवला. अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याची भूमिका तरुणाईने घेतल्याने हा संघर्ष यशस्वी झाला. या घडामोडींमुळे केंद्र सरकारला जनतेच्या भावना आणि लोकशाही मूल्यांची दखल घ्यावी लागली. भविष्यातही जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून लोकशाहीला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्यास देशातील जनता लोकशाही मार्गाने त्याला उत्तर देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, युवक, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी-युवक संघटना तसेच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लोकशाहीप्रेमी जनतेचे अभिनंदन करत सुभाष लांडे यांनी त्यांना “क्रांतिकारी लाल सलाम” अर्पण केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *