सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय डाक विभाग, अहिल्यानगर विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, शाखा पोस्टमास्तर (BPM), संपूर्ण सुकन्या ग्राम अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंच यांचा भव्य सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
स्टेशन रोड येथील सहकार सभागृहात झालेल्या या सन्मान सोहळ्यात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. प्रीती अग्रवाल (IPoS), पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास विकासजी पालवे (IPoS), वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर विभाग, विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, सरपंच, शाखा पोस्टमास्तर, विविध मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय डाक विभागाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. अहिल्यानगर विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात राबविलेल्या बचत योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI), इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आधार सेवा, स्पीड पोस्ट, वित्तीय समावेशन आणि महिला व बालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या संपूर्ण सुकन्या ग्राम अभियानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यानंतर पोस्टमास्टर जनरल सौ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण सुकन्या ग्राम अभियान प्रभावीपणे राबवून गावातील पात्र मुलींची मोठ्या प्रमाणावर सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण भागात उत्कृष्ट ग्राहक सेवा, शासकीय योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार आणि डाक विभागाच्या सेवांचा विस्तार करणाऱ्या शाखा पोस्टमास्तरांचा (BPM) विशेष सन्मान करण्यात आला.
याशिवाय भारतीय डाक विभागातील विविध संवर्गांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांनाही त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट सेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्राहकाभिमुख कार्यपद्धती, महसूलवाढ, उत्कृष्ट कार्यालयीन व्यवस्थापन आणि विभागाच्या उद्दिष्टपूर्तीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन पोस्टमास्टर जनरल पुणे क्षेत्र सौ. प्रीती अग्रवाल यांनी पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारतीय डाक विभाग हा केवळ टपाल सेवा देणारा विभाग नसून देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत वित्तीय समावेशन, बचत, विमा, डिजिटल बँकिंग, आधार सेवा आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यात अधिकारी, कर्मचारी, शाखा पोस्टमास्तर, ग्रामपंचायती व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः संपूर्ण सुकन्या ग्राम अभियानामुळे मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेबाबत समाजात जनजागृती झाली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला आहे. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात भारतीय डाक विभागाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विकास पालवे (IPoS), वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर विभाग यांनी विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. अहिल्यानगर विभागाने ग्राहकाभिमुख सेवा, डिजिटल सुविधा, ग्रामीण भागातील वित्तीय समावेशन, विमा व्यवसाय, बचत बँक सेवा आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या प्रसारामध्ये उल्लेखनीय प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामीण भागातील सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशा गौरव समारंभांचे नियमित आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास उपस्थित ग्रामपंचायत प्रतिनिधी, सरपंच, शाखा पोस्टमास्तर, अधिकारी व कर्मचारी यांनी हा सन्मान आपल्या कार्याची पावती असून भविष्यात आणखी जोमाने, निष्ठेने आणि लोकाभिमुख भावनेने सेवा देण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

