पै. नाना डोंगरे यांनी केले रथाचे पूजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे शहरातील मार्केट यार्ड परिसरात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, निमगाव वाघा यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते दिंडीतील रथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी किसान पतसंस्थेचे सचिव महादेव पाचारणे, संगीता पाचारणे, दत्ता सातपुते, पै. संदीप डोंगरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अध्यात्माचा आणि सामाजिक एकात्मतेचा अमूल्य वारसा आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी हजारो वारकरी पायी प्रवास करतात. या विठ्ठलभक्तांचे स्वागत करणे आणि त्यांची सेवा करणे हे प्रत्येकासाठी मोठे भाग्य आहे. वारकरी परंपरेने समाजाला समता, बंधुभाव, संयम आणि निस्वार्थ सेवेची शिकवण दिली आहे. ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पै. किसनराव डोंगरे यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून आमची संस्था सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. वारकऱ्यांच्या स्वागताचा हा उपक्रमही त्याच सेवाभावातून आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

