• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसीत उद्योजक व कामगारांनी विठ्ठलनामाच्या गजरात केले वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत

ByMirror

Jul 14, 2026
हजारो वारकऱ्यांची सेवा हीच आमची विठ्ठलभक्ती -योगेश गलांडे

‘10 हजारांहून अधिक वारकऱ्यांना पाणी, अल्पोपहार आणि आरोग्यसेवा; दिंडी स्वागताने जपली वारकरी परंपरा’


हजारो वारकऱ्यांची सेवा हीच आमची विठ्ठलभक्ती -योगेश गलांडे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात आगमन करणाऱ्या विविध दिंडींचे एमआयडीसीतील नगर-मनमाड मार्गावर उद्योजक, कामगार आणि बालाजी सेवा सोसायटीच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या सेवाभावी उपक्रमात विविध दिंडींमधील सुमारे 10 हजारांहून अधिक वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, अल्पोपहार तसेच उपवासाचे साहित्य वाटप करण्यात आले.


याचबरोबर दिंडीतील वारकरी निरोगी राहावेत आणि प्रवासात कोणत्याही आरोग्यविषयक अडचणी उद्भवू नयेत, यासाठी डॉक्टरांची विशेष टीम दिवसभर सेवेसाठी कार्यरत होती. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्‍यक औषधोपचारही करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी आयोजकांबद्दल समाधान व्यक्त करत सेवाभावाचे कौतुक केले.
यावेळी गगनगिरी महाराज सरला बेट पायी दिंडी सोहळ्याचेही स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनी या सेवाभावी उपक्रमाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “अहिल्यानगरच्या प्रवेशद्वारावरच वारकऱ्यांना प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाचा अनुभव मिळणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. वारकरी संप्रदायात सेवा हीच खरी ईश्‍वरभक्ती मानली जाते. हजारो वारकऱ्यांची निःस्वार्थ भावनेने सेवा करून आयोजकांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमांमुळे वारकरी परंपरेतील प्रेम, समता आणि मानवतेचे मूल्य अधिक दृढ होत असून ही सेवा पुढील अनेक वर्षे अखंडपणे सुरू राहो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना व्यक्त केली.


या स्वागत सोहळ्याला आमदार संग्राम जगताप यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि अध्यात्माची ओळख आहे. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करण्यासारखे आहे. बालाजी सेवा सोसायटी, उद्योजक, कामगार आणि नागरिकांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे व शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही या उपक्रमाला भेट देऊन समाधान व्यक्त केले. त्यांनी “वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. समाजातील उद्योजक, कामगार आणि नागरिकांनी एकत्र येत इतक्या मोठ्या प्रमाणावर सेवा उभारली, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली.


युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे म्हणाले, ही सेवा सुरू करण्यामागे फक्त शहरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांप्रती असलेली श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारीची भावना आहे. हजारो वारकऱ्यांची सेवा हीच आमच्यासाठी खरी विठ्ठलभक्ती आहे. या उपक्रमाचे हे पहिले वर्ष असले तरी भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात ही सेवा राबविण्याचा आमचा संकल्प आहे. दरवर्षी हजारो वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. वारकरी सुखरूप आणि आनंदाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतील, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी समाधानाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैभव सुरवसे यांनी या स्वागत सोहळ्यात उद्योजक, कामगार आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकदिलाने जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे हजारो वारकऱ्यांना सेवा देणे शक्य झाले. हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे त्यानी सांगितले.


दिंडी स्वागतासाठी वैभव शेटिया, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शंकर शेळके, नरेश शेळके, राजू काका शिवाळे, सरपंच डॉ. डोंगरे, अशोक शेळके, असलम इनामदार, संतोष कांबळे, सागर सप्रे, विनायक भोर, गोरख गव्हाणे, डॉ. अोजस मुनोत, डॉ. सिध्दी मुनोत, हर्षवर्धन देशपांडे, श्रीनिवास सिधम, अतुल झावरे, अमित बरावकर, वैभव सुरवसे, सुनील शेवाळे, राजू ढगे, नगरसेवक आकाश कातोरे, दिपक गिते, नगरसेवक बाबूशेठ नगरगोजे, राम घाडगे, शुभम बिडवे, डॉ. गडगे, विवेक घाडगे, अविनाश कार्डिले, दत्तात्रय तापकिरे, डॉ. शिवाजी लोंढे, सॅम्युअल पाटोळे, अजीनाथ शिरसाठ, दिपक परभने, भरत दिंडे, वैष्णव गलांडे, राहुल नळे, अंबादास वांढेकर, मनीष फिरोदिया, दत्ता जयभाय, शुभम बिडवे, केशव नगरगोजे, पवन क्षिरसागर आदी उपस्थित होते.
डॉ. शिवाजी लोंढे व सॅम्युअल पाटोळे यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. या सेवाभावी उपक्रमामुळे शहरात दाखल होणाऱ्या हजारो वारकऱ्यांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळाला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *