खंडोबा मंदिर परिसर होणार हिरवाईने समृद्ध; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सध्याच्या परिस्थितीत वृक्ष संगोपनाची गरज -शिवाजी पालवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा ठेवा निर्माण करण्याच्या उद्देशाने जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील खंडोबावाडी परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. खंडोबा मंदिर गड परिसरात तब्बल 65 वडांच्या झाडांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला.
या वृक्षारोपण कार्यक्रमास पाथर्डी तालुका पत्रकार संघाचे विलास मुखेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब पालवे, संदीप पालवे, कृष्णा काकडे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास नजन, अर्जुन भिटे, कृष्णा नजन, विजय भांड, सुनील नजन, बंटी हजारे, खंडू दुतारे, मुरलीधर आगासे, प्रवीण आगासे, साहेबराव दुतारे, रवी नगरे, रामा भिटे, माऊली हजारे, योगेश हजारे, सार्थक भिटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजी पालवे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून याचा फटका शेतीसह सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटत आले असतानाही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास ही परिस्थिती निर्माण होण्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. झाडे हीच भविष्यातील पावसाची, पर्यावरण संतुलनाची आणि मानवी जीवनाची खरी शिदोरी असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी झाडांची कत्तल न करता त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.
विलास मुखेकर म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. जय हिंद फाऊंडेशनने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करण्यावरही भर दिला पाहिजे. अशा उपक्रमांमुळे गावागावांत पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन भविष्यात हिरवाई वाढण्यास निश्चितच मदत होईल. प्रत्येकाने आयुष्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लागवड करण्यात आलेल्या सर्व वडाच्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

