• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगाव येथील पुणे हायवे ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

ByMirror

Jul 11, 2026
स्नेहांकुरला येणाऱ्या नागरिकांची होणार सोय

आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून केडगावचा झपाट्याने विकास होत आहे -नगरसेवक मनोज कोतकर


स्नेहांकुरला येणाऱ्या नागरिकांची होणार सोय


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रभाग क्रमांक 17 मधील पुणे हायवे ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक जालिंदर कोतकर यांनी केडगावच्या सर्वांगीन विकासासाठी सर्व नगरसेवक एकदिलाने कार्यरत असून, प्रभागातील प्रत्येक प्रलंबित प्रश्‍न टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.


नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, पुणे रोड ते स्नेहांकुर संस्थेपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण व डांबरीकरणाची मागणी स्नेहांकुर संस्थेकडून गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर झाला असून, आज या महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्नेहांकुर संस्थेत जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून नागरिक येत असल्याने या परिसरातील रस्त्याची दुरवस्था शहराच्या प्रतिमेला बाधा ठरत होती. ही बाब आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता हा रस्ता दर्जेदार स्वरूपात विकसित होणार असून, नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. स्नेहांकुर संस्थेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि आकर्षक होईल. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना अहिल्यानगर शहराची सकारात्मक आणि सुशोभित प्रतिमा पाहायला मिळेल, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.


जालिंदर कोतकर म्हणाले की, या कामाचा शुभारंभ सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत होत असल्याचा आनंद आहे. केडगाव विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्‍न नियोजनबद्ध पद्धतीने सोडविले जात आहेत. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील चारही नगरसेवक नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत आहेत. केडगावचा सर्वांगीन विकास करून हा परिसर आदर्श आणि विकसित करण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रभागासह संपूर्ण केडगावमधील अनेक समस्या सोडविण्यासाठी सर्व नगरसेवक समन्वयाने काम करत आहेत. निवडणुकीनंतर गेल्या सहा महिन्यांपासून नवीन निधी उपलब्ध झाला नसला, तरी पूर्वी मंजूर झालेल्या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आगामी काळात जसा-जसा निधी उपलब्ध होईल, तसा-तसा प्रत्येक भागातील प्रलंबित प्रश्‍न प्राधान्याने सोडविले जातील. केडगावच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, त्यांच्या माध्यमातून आणखी मोठा विकासनिधी आणून केडगावला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावेळी स्नेहांकुर संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून विकासकामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमास नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक मयूर बांगर, उद्योजक जालिंदर कोतकर, उद्योजक सुमित लोंढे, उद्योजक सुजित काकडे, शरद ठुबे, केतन भंडारे, हितेश धागडे, स्नेहांकुर संस्थेचे संस्थापक,गिरीश कुलकर्णी, जया जोगदंड, डॉ. प्रीती भोंबे, बाळासाहेब वारुळे, रूपाली मुनोत, दिपाली बोरुडे, लखन चव्हाण, आशाबाई जोमेवाळे यांच्यासह स्नेहांकुर संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *