• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

सलग 14 वर्षे मुस्लिम समाजातील करीमशेठ हुंडेकरींकडून सायकल वारकऱ्यांचे भक्तीभावाने स्वागत

ByMirror

Jul 11, 2026
हुंडेकरी यांच्या सेवेला माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचा सलाम

‘वारकरी माझ्या दारात येतात, मी नशीबवान’ -करीमशेठ हुंडेकरी


हुंडेकरी यांच्या सेवेला माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचा सलाम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी करणाऱ्या वारकरी सायकलपटूंचे अहिल्यानगर शहरात मुस्लिम समाजातील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक हाजी करीमशेठ हुंडेकरी यांच्या वतीने भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गेल्या सलग 14 वर्षांपासून सुरू असलेली ही सेवाभावी परंपरा यंदाही कायम राखत हुंडेकरी परिवाराने वारकऱ्यांच्या निवास, भोजन, अल्पोपहार आणि इतर सर्व सोयींची उत्कृष्ट व्यवस्था केली. धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने गेल्या चौदा वर्षांपासून नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात येते. सुरुवातीला अवघ्या 75 सायकलपटूंनी सुरू झालेल्या या वारीत आज तब्बल 350 सायकलपटू सहभागी होत आहेत. यामध्ये 55 महिला सायकलपटूंचा समावेश असून, आठ दृष्टीहीन आणि एक पाय नसलेले तीन दिव्यांग टँडेम (डबल सीट) सायकलच्या माध्यमातून ही वारी पूर्ण करत आहेत. यंदाच्या वारीत तब्बल 200 नवीन सायकलपटूंनी सहभाग नोंदविला आहे.


या स्वागत सोहळ्यात नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे, वारी प्रमुख दविंदरसिंग भेला, सचिव नितीन कोटकर, सायकल दिंडीचे संस्थापक तथा माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल, वारी प्रमुख अश्‍विनी कोंडेकर यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हुंडेकरी परिवाराच्या सेवाभावाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “2014 मध्ये 75 सायकलपटूंनी सुरू झालेल्या या वारीसोबत हुंडेकरी परिवार सुरुवातीपासून उभा आहे. वारीतील सहभागींची संख्या सातत्याने वाढत असताना ‘तीनशे काय, तीन हजार वारकरी आले तरी त्यांची सेवा करू’ ही त्यांची उदात्त भावना मनाला स्पर्श करणारी आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे हे जिवंत उदाहरण असून, त्यांच्या सेवेतून खरी माणुसकी अनुभवायला मिळते.”
हाजी करीमशेठ हुंडेकरी यांनीही अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “वारकरी कोणाच्या दारात सहज जात नाहीत. ते माझ्या दारात येतात, हे माझे भाग्य आहे. परमेश्‍वराने दिलेल्या कृपेने ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. मी नसतानाही माझी मुले ही परंपरा कायम ठेवतील. हुंडेकरी लॉनमध्ये कोणत्याही समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही शुल्क घेत नाही. माणुसकी टिकली तरच समाज टिकेल.” अशा भावनिक शब्दाने वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


यंदाची सायकल वारी ‘हरितवारी, पर्यावरणपूरक वारी’ या संकल्पनेसह अवयवदान जनजागृतीचा संदेश घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देत ही वारी दरवर्षी हजारो नागरिकांचे लक्ष वेधून घेते. यावेळी अविरत 14 वर्षे सायकल वारकऱ्यांचे स्वागत करणाऱ्या हाजी करीमशेठ हुंडेकरी यांचा नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. “हुंडेकरी परिवाराच्या योगदानामुळे प्रत्येक सायकलपटूला नवचैतन्य मिळते,” अशा भावना अनेक सायकलिस्टांनी व्यक्त केल्या.
स्वागत सोहळ्यावेळी युगंदर वाद्यपथकाच्या दणदणीत वादनाने परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाला. पहिल्यांदाच वारीत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी आपले अनुभव कथन करत वारीमुळे मिळालेली ऊर्जा, शिस्त, भक्ती आणि सामाजिक जाणीव यांचा उल्लेख केला.


विशेष म्हणजे, या सायकल वारीचा पहिला मुक्काम दरवर्षी हुंडेकरी लॉनमध्येच असतो. या दिवसासाठी लॉन पूर्णपणे वारकऱ्यांसाठी राखीव ठेवले जाते. अगदी लग्नाचे बुकिंगही या दिवशी स्वीकारले जात नाही. वारकऱ्यांच्या निवासापासून नाश्‍ता, भोजन आणि आवश्‍यक सर्व सुविधांची मनापासून व्यवस्था केली जाते. गेली 14 वर्षे अखंड सुरू असलेली ही सेवा केवळ आदरातिथ्य नसून, समाजात राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि माणुसकीचा दीप तेवत ठेवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. या उपक्रमातून ‘धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ’ हा संदेश दिला जात आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *