• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘निरोगी आरोग्याचा कानमंत्र घेऊन महिलांचा हरित शहर’चा संकल्प

ByMirror

Jul 7, 2026
प्रयास दादी-नानी ग्रुपचा पुढाकार

प्रयास दादी-नानी ग्रुपचा पुढाकार


योग, निसर्गोपचार आणि वृक्षलागवडीचा संगम; महिलांनी घेतले निरोगी जीवनशैलीचे धडे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक घरातून हरित शहराच्या संकल्पनेला बळ मिळावे, या उद्देशाने प्रयास दादी-नानी ग्रुपने महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘हरित शहर’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमात महिला सदस्यांना उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने विविध देशी वृक्षांची रोपे वितरित करण्यात आली. महिलांनी आपल्या घराच्या अंगणात, परिसरात आणि उपलब्ध जागेत वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याच कार्यक्रमात महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी निसर्गोपचार, योग, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्य याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली या दोन्हींचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला.


निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी ‘आहार, व्यायाम आणि निरोगी आरोग्य’ या विषयावर अत्यंत मार्गदर्शक व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे.


त्या म्हणाल्या, “महिलांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी, योगाभ्यासाने आणि प्राणायामाने झाली तर संपूर्ण दिवस उत्साही राहतो. सात्विक, संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. ऋतूनुसार उपलब्ध फळे, भाज्या आणि नैसर्गिक रंगांनी समृद्ध अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.”
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरल्या त्या प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा. वयाच्या साठीनंतरही त्यांनी अत्यंत अवघड योगासने सहजतेने करून उपस्थित महिलांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या लवचिकतेने आणि उत्साहाने उपस्थित महिलांना आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला. यावेळी त्यांनी सांगितले, योग हा एका दिवसाचा चमत्कार नसून सातत्यपूर्ण साधना आहे. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी नियमित योगाभ्यास, योग्य आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळत आहे. त्यामुळेच आजही मी निरोगी आणि ऊर्जावान आहे. प्रत्येक महिलेने दररोज किमान काही मिनिटे योगासाठी द्यावीत. निरोगी शरीर आणि शांत मन हेच आयुष्यातील खरे वैभव असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा राजश्री शितोळे, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, ह.भ.प. प्रभाताई भोंग, उपाध्यक्षा सुचेता बोरकर, सचिव उज्वला बोगावत, खजिनदार मेघना मुनोत, तसेच शामल शिंदे, सुनिता काळे, वर्षा गांधी, सुनीता चक्रवर्ती, गीता कवाने, कविता शिंगवी, छाया भंडारी, प्रिया गुंदेचा, प्रतिभा भिसे, आरती थोरात, लीला अग्रवाल, सुजाता कदम, उषा सोनी, नीलिमा पवार, अलका वाघ, सुरेखा जंगम, शशिकला झरेकर, प्रतिभा रासकर, हेमा पडोळे, शकुंतला जाधव, आशा गायकवाड, ॲड. ज्योत्स्ना कुलकर्णी, संगीता डिडवानी, सविता धामट, रेखा फिरोदिया यांच्यासह महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, प्रयास ग्रुप मागील अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि बौद्धिक उपक्रम राबवत आहे. “महिलांचा आत्मविश्‍वास वाढविणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचे आरोग्य जपणे आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढविणे हा आमच्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. वर्षभर योग शिबिरे, आरोग्य मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून महिलांना सकारात्मक आणि सक्रिय जीवनशैलीकडे प्रेरित केले जाते असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या कमिटीवर निवड झाल्याबद्दल ॲड. रवींद्र शितोळे यांचा प्रयास ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक, बौद्धिक आणि ज्ञानवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी ह.भ.प. प्रभाताई भोंग यांनी धार्मिक, सामाजिक आणि आरोग्य जनजागृतीसाठी प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. समाजातील महिलांना एकत्र आणून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य या संस्था प्रभावीपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर राजश्री शितोळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपा सोनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *