• Sat. Jul 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री क्षेत्र साकळावी देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

ByMirror

Jul 3, 2026
श्री क्षेत्र साकळावी देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन भाविकांमध्ये जनजागृती; भाविकांनी घेतली स्वच्छतेची शपथ;


डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र साकळावी (ता. श्रीगोंदा) येथील देवी मंदिर परिसरात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थ आणि भाविक देखील सहभागी झाले होते.
पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छता अभियान सुरु आहे. यानिमित्त साकळावी देवी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, महेंद्र सरोदे, प्रदीप झरेकर, कैलास वाळके, राजू जाधव, भाऊसाहेब डोंगरे, अमोल डोंगरे, बापू जाधव तसेच श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.


पावसाळ्यात साचणारे पाणी, वाढणारी अस्वच्छता आणि त्यातून पसरणाऱ्या साथीच्या आजारांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. स्वतः स्वच्छ राहणे, परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा उघड्यावर न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि गाव स्वच्छ राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छतेचे सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्वही उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या घरासह सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा. डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. गावागावात स्वच्छतेची जनजागृती करून नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *