• Sat. Jul 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

रविवारी अहिल्यानगरात धनगर समाजाचा मेळावा

ByMirror

Jul 3, 2026

यशवंत सेना व जय मल्हार संस्थेचा संयुक्त पुढाकार; राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण


समाजाच्या विविध प्रश्‍नांवर व शासकीय योजनांबद्दल होणार मार्गदर्शन; अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यान


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंत सेना, अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हा मेळावा संपन्न होणार असून, समाजातील विविध प्रश्‍नांवर चर्चा, मार्गदर्शन, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी केले आहे.


पुण्यश्‍लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून, यशवंत सेना महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष माधव (भाऊ) गडदे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील गुणवंत, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्तृत्ववान व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


मेळाव्याला सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश देविदास पाटील, दिव्यांग विकास महामंडळाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ए. एस. त्रिभुवन, प्राचार्य तुळशिराम रामभाऊ भोजने, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, ओबीसी महामंडळाचे संचालक विनोद लोंढे, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, नगरसेवक ज्ञानेश्‍वर शिवाजी येवले, विजय पठारे, मनोज कोतकर, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, अरुण वाघमोडे, डॉ. राहुल पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


मेळाव्यात धनगर समाजासमोरील विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्‍नांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्‍यक असलेल्या विविध विषयांवर उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार असून, समाजातील युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळविता येईल, याबाबतही माहिती दिली जाणार आहे.


यावेळी इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ हे ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, राज्यकारभार आणि सामाजिक योगदान’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. त्यांच्या व्याख्यानातून अहिल्यादेवींच्या आदर्श नेतृत्वाची, लोककल्याणकारी कारभाराची आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यावर उजाळा टाकला जाणार आहे. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *