विजयाची केली हॅट्रिक; सडन डेथमधून सुमन एंटरप्रायझेस एफसीवर 4-3 अशी मात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील मैदानावर युनिटी फुटबॉल क्लबच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित युनिटी गोल्डन कप फिरोदिया शिवाजियन्स संघाने पटकाविला. 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब संघाने सुमन एंटरप्रायझेस फुटबॉल क्लब सडन डेथ पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांमध्ये चुरस कायम राहिल्याने निकाल सडन डेथमध्ये गेला. सडन डेथमध्ये फिरोदिया शिवाजियन्सच्या खेळाडूंनी अचूक फटके मारत 4-3 असा विजय मिळवून चषकावर आपले नाव कोरले. या विजेतेपदासह फिरोदिया शिवाजियन्सने सलग तिसऱ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपली विजयी घोडदौड कायम राखली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी किशन चौहान, राजेश चौहान, सुशील लोट तसेच युनिटी फुटबॉल क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीसांमध्ये फिरोदिया शिवाजियन्सचा सार्थक भोसले याला सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर, सुमन एंटरप्रायझेसचा ओम डोंगरे याला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, तर फिरोदिया शिवाजियन्सच्या स्वराज आडेप याला सर्वोत्कृष्ट बचावपटू (बेस्ट डिपेंडर) या सन्मानासह गौरविण्यात आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजयी, उपविजयी व उत्कृष्ट खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युनिटी फुटबॉल क्लबचे किशन चौहान, राजेश चौहान, सुशील लोट तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. युनिटी फुटबॉल क्लबच्या वतीने स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.

