• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

युनिटी योगाच्या निशुल्क योग प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Jun 28, 2026
युनिटी योगाच्या निशुल्क योग प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा” -अरबाज शेख (योग प्रशिक्षक)


योगातून आरोग्य, आत्मविश्‍वास आणि सकारात्मकतेचा संदेश; दररोजच्या योगाभ्यासातून निरोगी समाज घडविण्याचा संकल्प


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी, तंदुरुस्त आणि तणावमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने युनिटी योगाच्या वतीने शहरात निशुल्क योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. न्यू टिळक रोड येथील माऊली मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला विविध वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योगाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिराचे उद्घाटन हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ आणि सूर्या मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योग प्रशिक्षक अरबाज शेख, वासुदेव कुटुंबकम योगा अँड फिटनेस सेंटरचे संचालक विशाल ठोकळ, योगतज्ज्ञ नदाफ सर, ध्यानधारणा तज्ज्ञ रविषा मॅडम, लाईफ लाईन फिटनेस जिमचे तय्यैब शेख, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


योग प्रशिक्षक अरबाज शेख यांनी उपस्थित साधकांना सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, तसेच विविध योगासनांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक आसनाचा शरीरातील विविध अवयवांवर होणारा सकारात्मक परिणाम, श्‍वसनक्रिया सुधारण्यामध्ये योगाचे योगदान, मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानाचे महत्त्व आणि नियमित योगाभ्यासामुळे होणारे आरोग्यदायी फायदे याविषयी त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व साधकांकडून विविध योगासनांचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला.


यावेळी बोलताना अरबाज शेख यांनी सांगितले की, आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण, शारीरिक व्याधी आणि असंतुलित जीवनशैली वाढत आहे. “योग म्हणजे केवळ काही आसने करण्याचा व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन शांत आणि विचार सकारात्मक राहतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात किमान काही वेळ योगासाठी देण्याचे त्यांनी आवाहन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गांधी यांनी केले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व साधकांना योगा मॅट, पाण्याची बाटली आणि फ्रुट ज्यूस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. युनिटी योगाच्या वतीने दररोज नगरपुणे रोड येथील ओम गार्डनमधील हॉलमध्ये नियमित योग प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने योगासने, प्राणायाम, ध्यान आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रत्येकाने निरोगी आणि आनंदी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन युनिटी योगाच्या वतीने करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *