जात, पितृसत्ता आणि मानसिक गुलामगिरीविरोधात संविधानाधिष्ठित जनआंदोलनाची घोषणा; पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार
बंधुता आणि संविधान मूल्यांचा प्रसार करण्याचा निर्धार; महाडच्या ऐतिहासिक मनुस्मृती दहन शताब्दीनिमित्त अभियान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरासह गावोगावी आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर ‘राष्ट्रीय मनुस्मृती उच्चाटन शताब्दी समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी आणि अशोक सब्बन यांनी दिली. या समितीच्या माध्यमातून जातीयता, पितृसत्ता, मतदास्य, सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामगिरीविरोधात संविधानाच्या मूल्यांवर आधारित व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने म्हंटले आहे की, मनुस्मृती ही केवळ ऐतिहासिक ग्रंथरचना नसून भारतीय समाजाच्या मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेवर दीर्घकाळ प्रभाव टाकणारी विचारप्रणाली आहे. जन्म, जात, वर्ण, लिंग, श्रम आणि प्रतिष्ठेच्या आधारावर समाजात भेद निर्माण करणारी ही व्यवस्था मानवी समानता आणि प्रतिष्ठेच्या विरोधात उभी राहिली. त्यामुळे मनुस्मृतीचे उच्चाटन म्हणजे केवळ एका ग्रंथाचा विरोध नसून समाजाच्या विचारसरणीत आणि व्यवहारात रुजलेल्या विषमतेच्या मानसिकतेत परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनुष्य जन्मतः जातीयवादी नसतो. जातीयतेची भावना ही जनुकांमध्ये नसून ती संस्कार, कुटुंबव्यवस्था, सामाजिक वातावरण, धार्मिक भीती, भाषा आणि राजकीय वापरातून पिढ्यान्पिढ्या मनामध्ये रुजत जाते. या प्रक्रियेला ‘नॉन जेनेटिक इन्फॉर्मेशन’ असे संबोधण्यात आले असून हीच माहिती व्यक्तीच्या विचारांवर आणि निर्णयक्षमतेवर प्रभाव टाकते, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘केंद्राभिमुख भावनिक कॉन्शिअो शासन’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. स्वतःचा स्वार्थ, सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती आणि जातीय वर्चस्व यांना सर्वोच्च स्थान देणारी मानसिकता समाजात विषमता वाढवित असल्याचा दावा करण्यात आला आहे. मनुस्मृतीने अशा प्रवृत्तींना धार्मिक आणि सामाजिक मान्यता देण्याचा प्रयत्न केला. स्वार्थाला धर्म, जन्माधारित श्रेष्ठत्वाला ईश्वरी व्यवस्था, स्त्रीदास्याला कर्तव्य, श्रमदास्याला नियती आणि जातदास्याला परंपरा म्हणून स्वीकारण्याची मानसिकता समाजात निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेच्या मते, समाजातील अनेक निर्णय आजही जातीय मानसिकतेच्या प्रभावाखाली घेतले जातात. मतदान, विवाह, सामाजिक संबंध, धार्मिक आचार-विचार आणि प्रतिष्ठेचे निकष यामध्ये जात हा घटक प्रभावी राहिला आहे. त्यामुळे केवळ कायदे बदलून सामाजिक परिवर्तन घडणार नाही, तर अंतर्मनातील विषमता आणि पूर्वग्रहांचे उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केलेल्या मनुस्मृती दहनाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरात सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाबासाहेबांनी बाह्य मनुस्मृतीचे दहन केले, आता अंतर्मनातील विषमतावादी मानसिकतेचे उच्चाटन करण्याची गरज असल्याचे मत ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. या अभियानासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘पसायदान’ला प्रेरणास्थान मानण्यात आले आहे. पसायदान हे सर्वभूतहित, समता, मैत्री, ज्ञान, करुणा आणि विश्वकल्याणाचा संदेश देणारे तत्त्वज्ञान असल्याचे सांगत, ते मनुस्मृतीच्या विषमतावादी विचारांच्या विरोधात समतेची दिशा देणारे असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
‘ओळखा, तपासा आणि बदला’ हा संदेश देत समितीने देशभर जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही समिती कोणत्याही व्यक्ती किंवा समाजघटकाविरुद्ध द्वेष पसरविण्यासाठी नसून अन्याय, जातीयता, पितृसत्ता, मतगुलामगिरी आणि मानसिक दास्याविरुद्ध संविधानिक, अहिंसक आणि लोकशाही मार्गाने सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी कार्य करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावोगावी जातिनाशाचा संकल्प, आंतरजातीय मैत्री, समान भोजन, समान शिक्षण, स्त्री-सन्मान, श्रम-सन्मान, मतमुक्ती, जातविरहित लोकशाही आणि संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यात येणार आहे. तसेच जातीनुसार मते, विवाह, देव, राजकारण आणि सामाजिक प्रतिष्ठा या मानसिक बेड्या तोडण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास अशोक सब्बन यांनी व्यक्त केला.
‘राष्ट्रीय मनुस्मृती उच्चाटन शताब्दी समिती’च्या स्थापनेसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी हे कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

