नियुक्तीबद्दल अहिल्यानगरमध्ये सन्मान; अहिल्यानगर शाखेच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव ठेवून बलभिम कुबडे यांचे योगदान -कॉ. आनंदराव वायकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, अहिल्यानगर शाखेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच टिळक रोड येथील कामगार कार्यालयाच्या कॉ. मधुकर कात्रे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बलभिम कुबडे यांची नंदुरबार येथे झालेल्या वार्षिक अधिवेशनात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अर्जुन बडदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. बैठकीला अहिल्यानगर विभागाचे सचिव गोरख बेळगे, जिल्हाध्यक्ष गंगाधर कोतकर, खजिनदार विठ्ठल देवक, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, एसटी बँकेचे माजी संचालक ज्ञानदेव अकोलकर, शिवाजीराव कडूस, कामगार नेते उत्तमराव रणसिंग यांच्यासह एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कॉ. आनंदराव वायकर यांच्या हस्ते बलभिम कुबडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उपस्थितांनी कुबडे यांच्या संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कॉ. आनंदराव वायकर म्हणाले की, “एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव ठेवून बलभिम कुबडे यांनी सातत्याने निष्ठापूर्वक काम केले आहे. सेवानिवृत्त कामगारांच्या विविध समस्यांवर संघटितपणे आंदोलन, पाठपुरावा आणि चर्चा करून त्यांनी अनेक प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ही निवड केवळ एका व्यक्तीची नसून सर्वसामान्य निवृत्त कामगारांच्या प्रतिनिधित्वाची निवड आहे.”
पुढे बोलताना त्यांनी कुबडे आपल्या कार्यक्षेत्रातील निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे संघटनेसमोर मांडतील आणि ते सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वास व्यक्त केला. बैठकीदरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, प्रलंबित आर्थिक लाभ तसेच इतर कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही संघटनेबरोबर सक्रियपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर कोतकर यांनी केले. त्यांनी नंदुरबार येथे झालेल्या वार्षिक अधिवेशनाचा सविस्तर आढावा घेत संघटनेच्या आगामी धोरणांची माहिती दिली. कार्याध्यक्ष अर्जुन बकरे यांनी संघटना बळकटीकरणासाठी विविध सूचना मांडत सदस्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना बलभिम कुबडे यांनी संघटना नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पाडणार असून, निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देत राहीन,” असे त्यांनी सांगितले.

