• Sat. Jun 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

सीए (डॉ.) शंकर अंदानी यांच्या खांद्यावर ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा

ByMirror

Jun 12, 2026
सीए (डॉ.) शंकर अंदानी यांच्या खांद्यावर ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा

आषाढी एकादशी व छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त निमगाव वाघा येथे रंगणार राज्यस्तरीय साहित्य संमेलन


सीए अंदानी यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै रोजी आषाढी एकादशी तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य, समाजकारण आणि लेखा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अहिल्यानगरचे सुपुत्र सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


संमेलनाच्या नियोजनासाठी शहरात आयोजित बैठकीत संयोजन समितीने सीए अंदानी यांच्या नावावर एकमताची मोहर उमटविली. संमेलनाचे प्रमुख संयोजक पै. नाना डोंगरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्रा. गणेश भगत, जालिंदर बोरुडे, संजय सावंत, संदीप रासकर, सरोज आल्हाट यांच्यासह साहित्यप्रेमी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांनी मराठी आणि हिंदी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी अनेक अभूतपूर्व विक्रम नोंदविले असून एकाच दिवशी तब्बल 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय ‘आई’ या विषयावर आधारित 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचाही मान त्यांनी मिळविला आहे.
त्यांनी आजवर लिहिलेल्या 12 हजार 100 हून अधिक कवितांचे विविध ग्रंथांमधून प्रकाशन झाले असून हा देखील स्वतंत्र जागतिक विक्रम म्हणून नोंदविण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबवत त्यांनी ‘वडील : बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1161 कवितांचे संकलन करून मराठीतील एक भव्य काव्यसंग्रह प्रकाशित केला. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1161 कवितांचे स्वतंत्र संकलन प्रकाशित करून कौटुंबिक नातेसंबंधांवरील साहित्याला नवी दिशा दिली.


अंदानी यांच्या या विक्रमी साहित्यिक कार्याची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. साहित्यिक कार्याबरोबरच सीए अंदानी हे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही परिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मंदिरे, मस्जिद, चर्च, धर्मशाळा तसेच विविध सामाजिक संस्थांना अत्यल्प मानधनात किंवा विनामूल्य लेखा आणि करसल्लागार सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 2022 मध्ये तब्बल 364 धार्मिक व सामाजिक संस्थांचे आर्थिक व करसल्लागार कामकाज सांभाळल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांची स्वतंत्र विक्रम नोंद केली होती.


त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि व्यावसायिक योगदानाची दखल घेत अमेरिकेसह विविध देशांतील संस्थांनी त्यांना ‘मेडल ऑफ एक्सलन्स’सह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविले आहे. आतापर्यंत त्यांना सुमारे 3180 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 115 जागतिक विक्रमांची नोंद आणि 150 मानद डॉक्टरेट पदव्या प्राप्त झाल्या आहेत.


व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले सीए शंकर अंदानी यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे सलग 18 वर्षे करसल्लागार म्हणून सेवा बजावली आहे. तसेच अहिल्यानगर महानगरपालिका, विविध शासकीय संस्था, बँका, पतसंस्था आणि सामाजिक संघटनांचे लेखापरीक्षक व करसल्लागार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. साहित्य, समाजसेवा आणि व्यावसायिक क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव म्हणून संयोजन समितीने त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केली आहे.


या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील नवोदित आणि ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार आहेत. साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे आणि विचारमंथनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच काव्यसंमेलनात अनेक नामवंत कवी-कवयित्री आपल्या रचना सादर करणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विशेष पुरस्कारांचे वितरणही या संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *