• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

खांबळी पाझर तलावातील पाणी व वीज चोरीप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

ByMirror

Jun 12, 2026
अधिकाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी पसायदानाचे प्रतिकात्मक प्रतिमा अर्पण

संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रीय भ्रष्टोबा’ घोषित करून, त्यांच्या प्रतिकात्मक दगडांना शेंडी-शेंदूर लावून निषेध


अधिकाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी पसायदानाचे प्रतिकात्मक प्रतिमा अर्पण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खांबळी पाझर तलावातील कथित पाणी चोरी व वीज चोरीप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात ‘राष्ट्रीय भ्रष्टोबा’ घोषित करून त्यांच्या निषेधार्थ दोन दगडांना शेंडी-शेंदूर लावण्यात आला. तसेच त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा आणि जनतेच्या समस्या समजाव्यात यासाठी संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानाचे प्रतिकात्मक प्रतिमा अर्पण करण्यात आले.
या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, रवी सातपुते, शंकर साळवे, तुकाराम बोरगे, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. अमित थोरात, बाळासाहेब पालवे, वीरबहादूर प्रजापती, वाय. के. शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


मौजे पळशी (ता. पारनेर) येथील खांबळी पाझर तलावासाठी महाराष्ट्र शासनाने 1986 साली जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर तलावाचे काम सुरू होऊन 1990 मध्ये तलाव पूर्णत्वास गेला. मात्र, तलाव परिसरातील काही व्यक्तींनी शासनाची परवानगी न घेता तलावाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे विहिरी खोदल्या असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वीज वितरण कंपनीची अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर वीजजोडणी करून किंवा आकडे टाकून विजेच्या मोटारी चालविण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केला. या मोटारींच्या साहाय्याने तलावातील पाणी दूरवरच्या शेतांमध्ये नेऊन मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


खांबळी पाझर तलावाच्या खालील भागात गाडेझाप परिसरातील सुमारे 200 ते 250 नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सरकारी खर्चातून विहीर बांधण्यात आली आहे. तसेच या भागातील जनावरे, शेळ्या-बकऱ्या आणि आदिवासी बांधवांच्या दैनंदिन गरजांसाठी हा तलाव अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

तलावाच्या आसपास 500 मीटर परिसरात कोणालाही विहीर खोदण्याचा अथवा पाण्याचा उपसा करण्याचा अधिकार नसल्याचे नमूद करत, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला. तलावातील पाणी कमी झाल्यास स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर तसेच शेतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


या प्रकरणी मृदा व जलसंधारण विभाग, वीज वितरण कंपनी तसेच इतर संबंधित कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रारी, अर्ज आणि निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण उपविभाग पारनेर आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा तसेच भ्रष्टाचारातून हप्ते घेऊन बेकायदेशीर प्रकारांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. बेकायदेशीर मोटारी जप्त करण्यात आल्या नाहीत तसेच संशयित वीजजोडण्या खंडित करण्यात आल्या नसल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून खांबळी पाझर तलावातील कथित पाणी चोरी आणि वीज चोरीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच संबंधित विभागातील कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करून त्यांना शासकीय व निमशासकीय सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. जनतेच्या हितासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाझर तलावाचे संरक्षण करावे, पाणी व वीज चोरी रोखावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन स्विकारले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *