पेन्शन, ईपीएस-95 आणि भविष्यातील आंदोलनाच्या दिशेवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा
अहिल्यानगर जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; संघटनेचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन 12 व 13 जून रोजी नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातील हजारो सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होणार असून, पेन्शन, ईपीएस-95, संघटनेची भावी वाटचाल आणि आंदोलनात्मक भूमिका यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
राज्याची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार येथील गजानन महाराज मंदिर, कोकणी हिल बसस्टॉपजवळ या ठिकाणी हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी सेवानिवृत्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बलभीम कुबडे, गोरख बेळगे, गंगाधर कोतकर, अर्जुन बकरे आणि विठ्ठल देवकर यांनी केले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात गेल्या वर्षभरात झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठका, उच्चाधिकार समितीच्या सभा, पेन्शन समितीच्या बैठका तसेच विविध प्रादेशिक चिंतन मेळाव्यांमधील निर्णयांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
संघटनेच्या कार्याचा लेखाजोखा मांडण्याबरोबरच आगामी काळातील धोरणात्मक दिशा निश्चित करण्यावरही भर दिला जाणार आहे. याशिवाय सन 2026 ते 2029 या कालावधीसाठीच्या केंद्रीय कार्यकारिणीला मंजुरी देणे, पेन्शन विषयातील अभ्यासू व अनुभवी सेवानिवृत्तांची समित्यांवर निवड करणे आणि संघटनेच्या विविध उपक्रमांबाबत निर्णय घेणे या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती बलभीम कुबडे यांनी दिली.
एसटी प्रशासन आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये ईपीएस-95 संदर्भातील प्रशासकीय शुल्काच्या प्रश्नावर सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. या संदर्भात संघटनेने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य विधी सल्लागार यांच्याशी सातत्याने चर्चा सुरू ठेवली असून, या समस्येवर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक विभागांमध्ये पेन्शनचे दावे प्रलंबित आहेत. ऑक्टोबर 2025 पासून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने प्रशासकीय शुल्क संगणकीय पद्धतीने भरण्याची अट घातल्यामुळे अनेक सेवानिवृत्तांची पेन्शन प्रक्रिया रखडली आहे. परिणामी अनेक पात्र कर्मचारी अद्याप पेन्शनपासून वंचित आहेत.
महामंडळाला प्रशासकीय शुल्क न भरण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून त्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत विचारे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, न्यायालयीन निर्देशांकडे दुर्लक्ष करून आडमुठेपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने महामंडळाने संबंधित कार्यालयाविरोधात अवमान याचिकाही दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा संघटना सातत्याने करत असून, आवश्यक असल्यास भविष्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबतही या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा एसटी पास मिळवून देणे हे संघटनेचे मोठे यश असल्याचेही सदानंद विचारे यांनी नमूद केले. या ऐतिहासिक निर्णयासाठी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष व माजी आमदार कै. गिरीश बापट, कै. भोयर (जालना), डी. टी. जाधव, किसनराव महेंद्रकर, कै. सुधाकर गुजराथी (नाशिक) तसेच कै. रमेश गवळी (अहिल्यानगर) यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
राज्यभरातील सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असून, नंदुरबार येथे होणारे हे अधिवेशन आगामी काळातील संघटनात्मक धोरण निश्चित करणारे आणि सेवानिवृत्तांच्या हक्कांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे म्हंटले आहे.
