• Fri. Jun 5th, 2026

जागतिक सायकल दिनानिमित्त निमगाव वाघात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली;

ByMirror

Jun 4, 2026

इंधन बचत, निरोगी आरोग्य व प्रदूषणमुक्तीसाठी सायकलचा वापर करण्याचा संदेश


मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम; सायकल रॅलीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मेरा युवा भारत अहिल्यानगर आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नवनाथ विद्यालयात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी गावातून सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.


विद्यालय परिसरातून मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उपशिक्षक शरद भोस, मंदा साळवे, स्वाती इथापे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, निकिता रासकर-शिंदे, श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, प्रशांत जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सायकल रॅलीचे गावातील प्रमुख रस्त्यांवरून उत्साहात मार्गक्रमण झाले. विद्यार्थ्यांनी “सायकल चालवा-आरोग्य जपा”, “इंधन वाचवा-देश वाचवा”, “प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी सायकलचा वापर करा” अशा घोषणा दिल्या. या रॅलीमुळे ग्रामस्थांचे लक्ष वेधले गेले असून पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.


कार्यक्रमात सायकलचे आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. वाढते वाहन प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि बदलते पर्यावरणीय संतुलन यामुळे सायकलचा वापर ही काळाची गरज बनली असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. दैनंदिन जीवनात शक्य तितक्या वेळा सायकलचा वापर केल्यास आरोग्य सुधारण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षणही होऊ शकते, असा संदेश देण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांनी सायकल चालविण्याचा संकल्प करत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमास मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष आणि रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, “सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून निरोगी जीवनशैलीचे प्रतीक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमध्ये सायकलचा वापर वाढविणे अत्यंत आवश्‍यक आहे. सायकलमुळे इंधनाची बचत होते, पर्यावरणाचे रक्षण होते आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहते. विद्यार्थ्यांनी आज दिलेला संदेश समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक नागरिकाने शक्य तितक्या वेळा सायकलचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, जागतिक सायकल दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नसून पर्यावरण आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविणे ही शाळेची सामाजिक जबाबदारी आहे. सायकलचा नियमित वापर केल्यास शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक आरोग्य सुधारते आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी आज दिलेला संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *