पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाणे यांचे निवेदन
‘समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची गरज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंदू मेहतर/वाल्मिकी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी स्वतंत्र “महर्षी वाल्मिकी मेहतर आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर वाणे व ॲड. कुणाल वाणे यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडे विशेष पाठपुरावा करण्याची विनंतीही त्यांनी केली.
शिर्डी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानादरम्यान किशोर वाणे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, भाजप जिल्हा सरचिटणीस निखिल वारे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, ॲड. देवेंद्र बंब, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस सुनिल सकट, अंशुमन वाणे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हिंदू मेहतर/वाल्मिकी समाजाने गेल्या अनेक शतकांपासून हिंदू धर्माची परंपरा जपत साफसफाईचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मात्र या समाजाला दीर्घकाळ सामाजिक उपेक्षा, आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सामना करावा लागला आहे. आजही समाजातील मोठा वर्ग बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता आणि मूलभूत सुविधांच्या अभावाशी झुंज देत असल्याचे वाणे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात हिंदू मेहतर/वाल्मिकी समाजाची लोकसंख्या 25 लाखांपेक्षा अधिक असून समाजातील युवक, महिला, छोटे व्यावसायिक आणि बेरोजगारांना विशेष आर्थिक मदत, स्वयंरोजगाराच्या संधी आणि कौशल्य प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. सध्या विविध शासकीय योजनांचा लाभ समाजापर्यंत अत्यल्प प्रमाणात पोहोचत असल्याने स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करणे काळाची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात विविध समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत. त्यामध्ये शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळ आदींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हिंदू मेहतर/वाल्मिकी समाजासाठीही स्वतंत्र “महर्षी वाल्मिकी मेहतर आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगार निर्मिती, महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच लघुउद्योगांसाठी कर्ज योजना उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास किशोर वाणे व ॲड. कुणाल वाणे यांनी व्यक्त केला. यामुळे समाजाचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ होईल आणि समाज मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असेही म्हंटले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
