• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

दोन वर्षांपासून रखडलेल्या कोल्हार उदरमल घाटाच्या कामावर संताप

ByMirror

May 20, 2026
कामातील दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

आश्‍वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात काम ठप्प; जय हिंद फाऊंडेशनचे मुख्यमंत्री व बांधकाम विभागाच्या सचिवांना निवेदन


कामातील दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जेऊर-पाथर्डी मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हार उदरमल घाटाच्या दोन वर्षापासून रखडलेल्या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे काम अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, संबंधित काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे तसेच कामातील दिरंगाईची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.


या मागणीचे निवेदन जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पाठविले आहे. हे निवेदन जेऊर पंचक्रोशी तसेच चिचोंडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले असून, रखडलेल्या कामामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जेऊरवरून पाथर्डीकडे जाताना लागणारा कोल्हार उदरमल घाट हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर यांच्या माध्यमातून सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. “अहिल्यानगर-बुन्हानगर-आगडगाव-कोल्हार रस्ता प्रजिमा 49” अंतर्गत किलोमीटर 15/00 ते 18/00 या टप्प्यासाठी 350 लाख रुपये आणि किलोमीटर 18/00 ते 21/500 या टप्प्यासाठी 350 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.


या कामाचे भूमिपूजन 9 मार्च 2024 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. भूमिपूजनानंतर काही प्रमाणात काम सुरू झाले; मात्र काही दिवसांतच काम अचानक बंद पडले. परिणामी घाटातील रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


दरम्यान, या रखडलेल्या कामाबाबत जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी काम सुरू न झाल्यास परिसरातील सर्व गावांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून 25 फेब्रुवारी 2025 रोजी आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली. घाटातील खड्डे तातडीने बुजवले जातील तसेच पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणासह संपूर्ण घाटाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले होते.


प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि काही प्रमाणात खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. मात्र, पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन हवेतच विरले. आजही घाटातील अनेक भाग अपूर्ण असून, रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. नियमानुसार साइड पट्टी तयार करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी अद्याप खडीकरणही झालेले नाही. तब्बल दोन वर्षे दोन महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या पार्श्‍वभूमीवर संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, कामाच्या दर्जाची तपासणी करण्यात यावी तसेच वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच शासनाने तातडीने आदेश देऊन कोल्हार उदरमल घाटाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी जय हिंद फाऊंडेशन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *