• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे वेतन रखडले

ByMirror

May 19, 2026
संचमान्यता दुरूस्ती व इंटिग्रेट तात्काळ करावे -सचिन झगडे

संचमान्यता दुरूस्ती व इंटिग्रेट तात्काळ करावे -सचिन झगडे


संचमान्यता तात्काळ ‘इंटिग्रेट’ करण्याची माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता दुरुस्ती झालेल्या शंभराहून अधिक शाळांतील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही रखडले असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. संबंधित संचमान्यता शालार्थ प्रणालीमध्ये ‘इंटिग्रेट’ न झाल्यामुळे मे 2026 महिन्याचे वेतन फॉरवर्ड होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने याबाबत शिक्षण विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.


या संदर्भात अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन झगडे, सचिव अमोल ठाणगे आणि उपाध्यक्ष सोमनाथ सुंबे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक सुदाम दळवी, दीपक थोरात तसेच कोपरगाव तालुका संघटनेचे कैलास शेळके उपस्थित होते.


शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही शाळांची सन 2024-25 या वर्षातील संचमान्यता पदे शून्य झाली होती. त्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक कामकाजात अडथळे निर्माण झाले होते. मात्र सन 2025-26 च्या संचमान्यतेमध्ये संबंधित शाळांना पुन्हा पदे मंजूर करण्यात आली असून त्यानुसार संचमान्यता दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

तथापि, संबंधित संचमान्यता अद्याप शालार्थ प्रणालीमध्ये ‘इंटिग्रेट’ करण्यात आलेली नाही. परिणामी संबंधित शाळांचे वेतन प्रस्ताव फॉरवर्ड होत नसून मे 2026 चे वेतन रखडले आहे. अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना घरखर्च, बँक कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दैनंदिन आर्थिक व्यवहार सांभाळताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.


शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संचमान्यता तातडीने ‘इंटिग्रेट’ करावी व संबंधित शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत अदा करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय तांत्रिक कारणांमुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिक्षण विभागाने त्वरित कार्यवाही करून रखडलेल्या वेतनाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अन्यथा शिक्षक संघटनेच्या वतीने पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


–—–
“संचमान्यता दुरुस्ती झाल्यानंतरही शालार्थ प्रणालीमध्ये इंटिग्रेटची प्रक्रिया रखडल्याने शेकडो शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अडकले आहे. शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करून संबंधित शाळांचे वेतन सुरळीत करावे.”
-सचिन झगडे (अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *