छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन; साहित्य, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा जागर
ग्रामीण संस्कृती, वैचारिक चळवळ आणि प्रतिभावंत व गुणवंतांचा गौरवाने रंगले संमेलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात आणि वैचारिक वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील साहित्य, संस्कृती, लोकपरंपरा आणि समाजप्रबोधनाचा जागर घडविणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, शाहिर, समाजप्रबोधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे साहित्य संमेलन स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यिक, कवी, शाहिर, कथाकथनकार यांच्या विचारांची समृद्ध मैफल या संमेलनात रंगली. साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मकतेचा संदेश देत या संमेलनाने ग्रामीण भागात वैचारिक चळवळीचा जागर घडविला.
शाहिरी पोवाडे, काव्यवाचन, सामाजिक आशयाची गीते आणि विविध सादरीकरणांमधून “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा”, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक जबाबदारी, इतिहास जागर आणि समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आले. ग्रामीण संस्कृती आणि साहित्य परंपरेचा सुरेख संगम या संमेलनात अनुभवायला मिळाला.
संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तथा साहित्यिक प्रतिभा खैरनार, युवा किर्तनकार ह.भ.प. दिपाली गणगे-कोकाटे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत चाबुकस्वार, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, उद्योजक दिलावर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे म्हणाले की, “ग्रामीण भागात साहित्याची गंगा पोहोचावी, युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि समाजात सकारात्मक विचारांची बीजे पेरली जावीत, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केले जात आहे. हे संमेलनाचे सहावे पर्व असून महापुरुषांच्या जयंती उत्सवाला त्यांच्या विचारांच्या माध्यमातून साजरे करण्याचा प्रयत्न या संमेलनाद्वारे केला जात आहे.”
ॲड. कृष्णा झावरे म्हणाले की, शाहिरी, पोवाडे आणि काव्य यांच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जाणीवा जपण्यासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाच्या अध्यक्षा तथा साहित्यिक प्रतिभा खैरनार म्हणाल्या की, “साहित्यातून समाजाला उपदेश करणे सोपे असते; मात्र तळागाळापर्यंत सामाजिक चळवळ चालविणे अत्यंत कठीण असते. डोंगरे संस्थेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण साहित्य संमेलन ही केवळ काव्याची मैफल नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ असल्याचे त्या म्हणाल्या.
पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर म्हणाले की, “समाज परिवर्तनात साहित्यिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम साहित्यिक सातत्याने करत असतात.” त्यांनी गावातील तंटामुक्तीसाठी केलेल्या कार्याची तसेच राज्य शासनाकडून मिळालेल्या सन्मानाची माहिती उपस्थितांना दिली.
ह.भ.प. दिपाली गणगे-कोकाटे म्हणाल्या की, “किर्तनकार समाजाला योग्य प्रवाहात नेण्याचे कार्य करतो. संस्कार रुजविण्याची जबाबदारी किर्तनकार पार पाडत आहे. साहित्य आणि किर्तन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही समाजाला शहाणे करण्याचे काम करतात.” उद्योजक माधवराव लामखडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन पुरस्कार्थींचे अभिनंदन केले.
कवी संमेलन चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांच्या गीत सादरीकरणाने सभागृह मंत्रमुग्ध झाले. “मेरी प्यारी माँ…” या गीतापासून सुरुवात करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पोवाड्यांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. ग्रामीण कवी गीताराम नरवडे, देवीदास बुधवंत, उमेश गोरे, रमेश चव्हाण, दत्तात्रय फलके तसेच कथाकथनकार बाळासाहेब देशमुख यांनी विविध सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवर काव्य व कथांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप रासकर यांनी केले, तर आभार संदीप डोंगरे यांनी मानले.
–—
पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान
सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये चाँद हुसेन शेख, प्रा. गणेश भगत, अल्ताफ सय्यद, बाळासाहेब देशमुख, संदिप रासकर, सारिका उगले, मल्हारी खुडे, सुनिल वाघ, नर्गिस नूरमोहंमद शेख, हिरालाल बावीस्कर, गोकुळ बोरसे, रामचंद्र लोखंडे आणि अशोक भालके यांचा समावेश होता.
–—
इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
संमेलनात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. श्वेतांजली कार्ले, हेमलता बोडखे, सिध्दी कापसे, अपूर्वा कापसे आणि साई भूसारे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थितांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
