• Tue. May 19th, 2026

जायंट्‌स वेलफेअर फाउंडेशनच्या द्वितीय कौन्सिल मीटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

May 18, 2026

सहेली सिम्पोझियममधून महिला सक्षमीकरण, बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश


राज्यभरातील महिला प्रतिनिधींची उपस्थिती; सामाजिक कार्याचा आढावा


जायंट्सने शहरातील सामाजिक चळवळ अधिक व्यापक केली -संजय गुगळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्‌स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन 2B ची द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिम्पोझियम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. फेडरेशन कौन्सिलच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील महिला प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सामाजिक क्षेत्रात करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी, बचतीचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली या विविध विषयांवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व जायंट्‌स प्रार्थनेने झाली. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट, फेडरेशन सचिव सन्मती जैन, स्पेशल कमिटी मेंबर विनोद शेवतेकर, जगन्नाथ साळुंके, सहेली सिम्पोझियमच्या इन्चार्ज श्रीमती सूर्यमाला मालानी, संजय गुगळे, सचिव सन्मती जैन, अनघा अंबेकर, रंजना भावसार, रत्नाकर महाजन, सुरेखा अग्रवाल, सरिता मालानी, शीतल अग्रवाल, पायल गांधी, भावना मोहित कटारिया, नरेश गुप्ता, बलवंत शिंदे, अहिल्यानगर जायंट्‌स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, प्रशांत मालाणी, संजय सराफ, अनघा आंबेकर, रंजना भावसार, ऑफिसर बलवंत शिंदे, अभय मुथा, डॉ. विनय शहा आदींसह फेडरेशन कौन्सिलचे सर्व पदाधिकारी व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात बोलताना अहिल्यानगर जायंट्‌स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची संधी पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्थेचे कार्य सुरू असून, सक्षम भारत घडविण्यासाठी लहान मुलांना चांगले शिक्षण, संस्कार आणि सर्वांगिण जडणघडण मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


संजय गुगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जायंट्‌स वेलफेअर फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी पहिली भारतीय संस्था असून, या संस्थेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. भारतात निर्माण झालेल्या या संस्थेने परदेशातही आपले नेटवर्क उभारले आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. शहरात अनेक दिग्गज मंडळींनी या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून, आपण गेली 40 वर्षे जायंट्‌समध्ये कार्यरत असल्याचे सांगत ही सामाजिक चळवळ अधिक व्यापक होत असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


सहेली सिम्पोझियमच्या इन्चार्ज सूर्यमाला मालाणी यांनी महिलांच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमपणे सांभाळत सामाजिक कार्यातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. सहेली सिम्पोझियमच्या माध्यमातून देशभरातील महिला एकत्र येऊन सामाजिक व सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करतात आणि सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा देतात. महिलांकडून बचतीची सवय शिकण्यासारखी असून, आर्थिक प्रगतीसोबत बचतही तितकीच महत्त्वाची आहे. संकटकाळात हीच बचत उपयोगी पडते, असे सांगत त्यांनी देशासमोरील विविध आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर बचतीचा संदेश दिला.


निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत यांनी आहार, व्यायाम आणि निरोगी आरोग्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या परिस्थितीचा स्वीकार करून जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचे आवाहन केले. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने आणि आरोग्यदायी सवयींनी करण्याचा सल्ला देत त्यांनी आहारामध्ये रिफाइंड केलेल्या पदार्थांचे सेवन टाळण्याचा संदेश दिला. योग्य आहारामुळे अनेक आजार टाळता येतात. सिझनल फळे, नैसर्गिक रंगांची फळे व भाज्यांचा आहारात समावेश करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. कृत्रिम रंगांचा वापर टाळून नैसर्गिक आहारशैली आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमात महिलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. महिलांनी विविध कला सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. याशिवाय महिलांसाठी बौद्धिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पेशल कमिटी मेंबर्सनी उपस्थितांशी संवाद साधत विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले.


अध्यक्षीय मनोगतात फेडरेशन सचिव सन्मती जैन यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकत आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी व विद्या तन्वर यांनी केले, तर आभार सचिव अमित मुनोत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जायंट्‌स ग्रुपचे राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, अमित धोका, विद्या तन्वर,नूतन गुगळे, पूजा पातूरकर, शीतल कदम, अमित मुनोत आणि दीपक मुथा यांनी विशेष परिश्रम घेतले.



द्वितीय कौन्सिल मीटिंगमध्ये सामाजिक कार्याचा आढावा
दुसऱ्या सत्रात जायंट्‌स वेलफेअर फाउंडेशन 2B ची द्वितीय कौन्सिल मीटिंग फेडरेशन अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून फेडरेशनचे संचालक या बैठकीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सादर केली. फेडरेशन डायरेक्टर्सनी समाजोपयोगी नवनवीन उपक्रम राबविणे, आपल्या कार्यक्षेत्रात नवीन ग्रुप स्थापन करणे तसेच सदस्यसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. सामाजिक चळवळीचा विस्तार करत अधिकाधिक लोकांना या उपक्रमांशी जोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *