सचिवपदी हरिश हरवानी तर खजिनदारपदी विजय कुलकर्णी यांची निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक स्तरावर सेवाभावी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहिल्यानगरच्या वर्ष 2026-27 साठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी हरजितसिंह वधवा, सचिवपदी हरिश हरवानी आणि खजिनदारपदी विजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ही 210 हून अधिक देशांमध्ये सुमारे 15 लाख सदस्यांच्या माध्यमातून कार्यरत असलेली जगातील अग्रगण्य सेवाभावी संस्था आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरनेही शहरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक विकास, नेत्रतपासणी, आपत्ती निवारण तसेच वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात क्लबने ‘घर घर लंगर सेवा’ उपक्रमाद्वारे हजारो नागरिकांपर्यंत अन्नसेवा पोहोचवून उल्लेखनीय कार्य केले. तसेच मागील वर्षभरात कन्यादान, महिला सक्षमीकरण, युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, गरजू मुलींना सायकल वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. या उत्कृष्ट कार्याची दखल लायन्स इंटरनॅशनलने घेऊन क्लबला विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष हरजितसिंह वधवा हे एमआयडीसीतील उद्योजक असून गेली अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते एच ॲण्ड जे असोसिएट्स या औद्योगिक संस्थेचे प्रमुख असून, गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘घर घर लंगर सेवा’, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि गरजूंसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यांनी यापूर्वीही लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळली असून, क्लबमधील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजाभिमुख प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
नवनिर्वाचित सचिव हरिश हरवानी हे लायन्स चळवळीतील अनुभवी आणि कार्यक्षम पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी झोन चेअरपर्सन (ZC) तसेच PST म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांचे प्रभावी नियोजन, नेतृत्व आणि उत्कृष्ट जनसंपर्क ही त्यांची विशेष ओळख आहे. ते सिंधी समाज, पंजाबी समाज तसेच भारत भारती ग्रुपशी संलग्न असून अनेक सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांमध्ये सक्रिय योगदान देत आहेत.
नवनिर्वाचित खजिनदार विजय कुलकर्णी यांनी बी.एड. महाविद्यालयातून प्रदीर्घ सेवा करून निवृत्ती घेतली आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पाच वर्षे अहमदनगर शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या शालेय व्यवस्थापन समितीवर अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्य केले आहे. संस्कृत सेवा संघमध्ये सहकार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वैदिक ज्योतिषाचा सखोल अभ्यास केला असून राष्ट्रीय स्तरावर ज्योतिषाचार्य म्हणून जयपूर आणि पुणे येथे विशेष अतिथी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 2016 मध्ये त्यांनी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउनचे खजिनदार म्हणून काम पाहिले असून, गेल्या चौदा वर्षांपासून लायन्स क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच अनेक वर्षे कॅबिनेट स्तरावरील विविध पदांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
येत्या कार्यकाळात पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य सेवा, शिक्षण, युवक व महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. लवकरच होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यात नूतन पदाधिकारी मावळते अध्यक्ष डॉ. संजय आसनानी, सचिव प्रशांत मुनोत आणि खजिनदार दिलीप कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

