• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; बहुजन समाज पार्टीची मागणी

ByMirror

May 18, 2026
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; पेपर माफिया गुन्हेगारांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नीट (NEET-UG) परीक्षेमधील महाघोटाळा, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले असून, त्यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले आहे.


नीट (NEET-UG) परीक्षेमधील कथित महाघोटाळा, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल ओहळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, निलेश घोडके, फिरोज शेख, बाळकृष्ण काकडे, राम ससाणे, शिवम साळवे, राहुल हरिभगत, उस्मान शेख, राहुल पटेकर, सुरेश गायकवाड, संतोष मोरे, नवनाथ साळवे, छबु मोरे, मच्छिंद्र बर्डे, दत्ता साळवे, अनिल लष्करे, गणेश बागल, श्‍याम आवटी आदी उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, देशातील लाखो होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा हा ‘नीट पेपरफुटी घोटाळा’ अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्‍वास डळमळीत झाला आहे.


बहुजन समाज पार्टीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि मेहनतीचा प्रश्‍न उपस्थित करत म्हटले आहे की, देशातील गरीब, दलित, मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थी कर्ज काढून, रात्रंदिवस अभ्यास करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, विद्यमान सरकार आणि NTA च्या निष्काळजीपणामुळे तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लटकले आहे. विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा आणि पालकांच्या त्यागाचा हा मोठा अपमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या घोटाळ्याचे महाराष्ट्रातील नाशिकसह इतर भागांशी संबंध असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. पेपर माफिया आणि सफेदपोश गुन्हेगारांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर येत असून, ही राज्य सरकारच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेची मोठी अपयशाची बाब असल्याचे बहुजन समाज पार्टीने म्हटले आहे.


परीक्षा रद्द करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, केवळ किरकोळ आरोपींना अटक करून मुख्य सूत्रधार आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली वेळबद्ध आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींना फाशी सारखी कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. भविष्यात होणारी पुनर्परीक्षा पूर्णतः पारदर्शक, सुरक्षित आणि पेपरफुटीमुक्त वातावरणात घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.


परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आगामी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा प्रवास व इतर लॉजिस्टिक खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे. तसेच NTA ची जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर बहुजन समाज पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *