कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याच्या नियुक्तीची मागणी; आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे निवेदन
वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने नागरिकांमध्ये संताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भिंगार येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने केली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भिंगार वेस चौकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शहर वाहतूक शाखा तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, संपत बेरड, अनिल तेजी, सुदाम गांधले, दीपक लीपाने, अजिंक्य भिंगारदिवे, सागर चवंडके, दिनेश लंगोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भिंगार वेस हा परिसर हा अहिल्यानगर शहराला जोडणारा अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो. येथे सतत वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, प्रवासी तसेच दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भिंगार वेस परिसरातील वाहतूक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. 12 मे रोजी या ठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एका रुग्णवाहिकेलाही अडकून पडावे लागले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, रुग्णवाहिकेच्या चालकाला स्वतः वाहनातून खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, आपत्कालीन सेवांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे आर्थिक नुकसानासह जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. भिंगार परिसराचे योग्य नियोजन करून वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज असून, भिंगारकरांचा वाहतूक कोंडीत अडकलेला “श्वास” मोकळा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
भिंगार वेस चौकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त केल्यास वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास शिष्टमंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सदर मागणीचे निवेदन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना देण्यात आले.
