केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अक्षय कर्डिले यांचा होणार नागरी सत्कार
रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे -सुनिल साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कनगर (ता. राहुरी) येथे उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सामाजिक समतेचा संदेश देणारा हा सोहळा 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता उत्साहात पार पडणार असून, या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात ना. रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याबद्दल आमदार अक्षय कर्डिले यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी राज्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत. याशिवाय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह रिपब्लिकन पक्षातील अनेक राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, संविधान मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राहुरी शहरात या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीला वेग दिला आहे.
कार्यक्रमासाठी पक्षाचे संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, उत्तर महाराष्ट्र नेते राजाभाऊ कापसे, विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राहुरी तालुकाध्यक्ष विलास (नाना) साळवे, कनगर सरपंच सर्जेराव घाडगे, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश त्रिभुवन, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ यांच्यासह अजय साळवे, गणेश कदम, अंकुश भैलुमे, रवींद्र दामोदरे, संजय भैलुमे, दत्ता कदम, विशाल काकडे, कुंडलिक गंगावणे, अमोल देवळेकर, सतीश भैलुमे, अविनाश भोसले, बाळासाहेब शिंदे, राजा जगताप, राजू उबाळे, बाबा राजगुरू आणि सतीश मगर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
