मातृत्व दिनानिमित्त महिलांचा सन्मान अन् वृक्षसंवर्धनाचा संदेश
माता ही प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेरणास्थान -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मातृत्व दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांच्यासह ग्रुपमधील महिलांचा मातृत्व दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांना रोप भेट देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांचा संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ आणि सचिन चोपडा यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, स्मरणिका व रोप देऊन सत्कार करण्यात आला. मातृत्वाचा गौरव, कार्यकर्तृत्वाचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. यावेळी प्रांजली सपकाळ, शोभाताई मुंढे, संगीता सपकाळ, सुरेखाताई आमले, प्रियंका कर्डिले, मीनाताई परदेशी, आरतीताई बोराडे, मनीषा गायकवाड, आशाताई पराते, वंदनाताई बोधले, जहीर सय्यद, गंगाराम मुंढे, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, सचिन पेंढूरकर, अशोक पराते, ईवान सपकाळ, सुभाषराव पेंढूरकर, ताराचंद ठोकळ, इंजि. अनिल सोळसे, अविनाश जाधव, रतन मेहेत्रे, मुन्ना वाघस्कर, नवनाथ वेताळ, सुभाष पेंढुरकर, आनंद सदलापूर, दशरथ मुंडे, अविनाश पोतदार, अभिजीत पराते, एकनाथ जगताप आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सेवानिवृत्त होत असलेले गंगाराम मुंढे व शोभाताई मुंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचा व ग्रुपमध्ये असलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, “माता ही प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असते. मातेच्या प्रेरणेने मुले घडत असतात. श्रीमती अलकाताई कर्डिले यांच्या संस्काराने तिन्ही मुलींनी शहराच्या समाजकारण, राजकारणात योगदान देऊन अहिल्यानगर शहराच्या विकासाला चालना दिली. सध्या त्यांची मुलगी ज्योती गाडे महापौर पद भुषवित आहे. मागील काळात सुवर्णा कोतकर यांनी उपमहापौरपद भूषविले. तसेच शितल जगताप यांनी देखील नगरसेवकपदी काम करुन प्रभागातील प्रश्न सोडविले. तर नुकतेच राहुरी विधानसभेचे आमदार झालेले अक्षय कर्डिले हे स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय व सामाजिक वारसा चालविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मातृत्वाचा सन्मान करणे म्हणजे संस्कारांचा गौरव करणे होय. हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवत असून, समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य करत आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन सपकाळ यांनी केले. तर नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सचिन चोपडा म्हणाले की, “मातृत्व दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. महिलांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपने कायमच सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन आणि मानवी मूल्ये जपणारे उपक्रम राबविले आहेत. आमदार अक्षय कर्डिले यांच्या विजयामुळे राहुरी मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
