खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यात सध्या कारागृहात असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून फिर्यादी, जखमी व साक्षीदारांवर गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून, खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे व सुरेंद्र थोरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील नान्नज येथे 24 ऑगस्ट 2025 रोजी सुनील साळवे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश होता. या प्रकरणात खुनाचा प्रयत्न तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित आरोपी सध्या कारागृहात आहेत.
मात्र, आरोपींच्या नातेवाईकांकडून आता पीडित कुटुंबीय व साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “केस मागे घ्या, अन्यथा तुमच्यावर विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल करू,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जामखेड पोलीस ठाण्यात जखमी व साक्षीदारांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
सुनील साळवे यांनी सांगितले की, मागील हल्ल्यात त्यांच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून पत्नीचा हात निकामी झाला आहे. आजही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आधीच कुटुंबावर मोठा अन्याय झाला असताना पुन्हा खोट्या गुन्ह्यांद्वारे त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पोलीसांनी गुन्हे दाखल होत असताना निपक्षपातीपणे चौकशी करुन न्याय द्यावा. तसेच हल्लेखोरांच्या नातेवार्इकाकडून देखील जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रशासनाला इशारा देताना सांगण्यात आले की, पीडित कुटुंबीय किंवा साक्षीदारांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच साक्षीदार व जखमी कुटुंबीयांना संरक्षण देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
