सायन्स विभागाचा 91%, कॉमर्स विभागाचा 85% आणि आर्ट्स विभागाचा 70% निकाल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अहमदनगर महाविद्यालयाच्या सायन्स विभागाचा निकाल 91%, तर कॉमर्स विभागाचा 85% आणि आर्ट्स विभागाचा 70% निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये विज्ञान शाखेत अनुष्का रंजीत सोज्वळ हिने 80.50% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. अनुष्का राम भवनानी हिने 80.33% आणि मिहीर बेंजामिन गायकवाड याने 79.83% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले आहेत.
वाणिज्य शाखेत अरमान अली सोहेल अली सय्यद याने 89.17% गुण मिळवून महाविद्यालयात तसेच वाणिज्य शाखेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर ध्रुव महेंद्र खैरनार याने 85% आणि प्राप्ती यशवंत क्षीरसागर हिने 84.33% गुण मिळवून वाणिज्य शाखेत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले आहेत.
कला शाखेत माही इम्रान तांबोळी हिने 87% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, तर उर्वशी रामानंद शर्मा हिने 85.67% आणि डोरा विक्रम बार्णबस हिने 84.17% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले आहेत.
बी.पी.एच.ई. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्णबस व सचिव विशाल बार्णबस यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या आवारात या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रतुल कसोटे, तसेच पर्यवेक्षिका एस. टी. जाधव मॅडम उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी म्हणाले की, कनिष्ठ महाविद्यालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकल्पांना प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी मेहनत आणि कष्टाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक गुणवत्ता न पाहता त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणून देशासाठी आदर्श नागरिक बनविण्याचे काम केले गेले पाहिजे आणि त्याकडे महाविद्यालयाचा नेहमीच कल असतो. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या मेहनतीबरोबरच पालक आणि शिक्षकांनाही देत, हे एक सामूहिक यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
