ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
पै. नाना डोंगरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल विशेष सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय व नवनाथ विद्यालय परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनाथ विद्यालयात मेजर संजय खळदकर यांच्या हस्ते, तर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच किरण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताच्या सुमधुर वातावरणात उपस्थितांनी राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, सोमनाथ आतकर, दीपक जाधव, आरोग्य सहाय्यक मुकुंद ढोले, समुदाय आरोग्य अधिकारी सुवर्णा राऊत, आरोग्य सेविका अश्विनी झावरे, आशा सेविका संगिता आतकर, रुपाली गायकवाड, दिलापी कदम, माधुरी जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुणे येथील सोजाई आदिवासी महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या गौरवाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमास नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अरुण कापसे, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, प्रमोद जाधव, मयुर काळे, ज्ञानदेव कापसे, स्वाती इथापे, शरद भोस, आप्पासाहेब ठाणगे, तेजस केदारी, तुकाराम पवार, रेखा जरे, निकिता रासकर, तृप्ती वाघमारे, दिपाली ठाणगे, मंदा साळवे, पै. संदीप डोंगरे, प्रमोद थिटे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, महाराष्ट्र दिन हा केवळ राज्य स्थापनेचा दिवस नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र आणि सशक्त महाराष्ट्रात जगत आहोत. या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. आजचा कामगार दिन आपल्याला श्रमाचे महत्त्व अधोरेखित करून देतो. देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा खरा पाया हा श्रमिक वर्गाच्या कष्टांवर उभा आहे. ग्रामपंचायतमधील अधिकारी आणि कर्मचारी गावाच्या प्रगतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रशासन आणि जनसेवा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
