शिक्षक व महापालिका कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन
टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण प्रक्रिया सुरू; नागरिकांनी जनगणना प्रक्रियेला सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात 2026 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेच्या माध्यमातून जनगणनेच्या तयारीला वेग आला असून, दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडत आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट इमारतीमध्ये आयोजित या प्रशिक्षणात शिक्षक तसेच महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. महानगरपालिका समिती क्रमांक 3 अंतर्गत जनगणना अधिकारी शाम गोडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण होत आहे .
प्रशिक्षक मीरा जाधव व गीतांजली जोंधळे यांनी जनगणना प्रक्रियेचे महत्त्व, माहिती संकलनाची अचूक पद्धत, नागरिकांशी संवाद कसा साधावा यासह विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करत आहे . जनगणना करताना आवश्यक असलेली दक्षता, माहितीची गोपनीयता आणि अचूकता यावर विशेष भर देण्यात येत आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण 25 ते 27 एप्रिल दरम्यान पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण 28 ते 30 एप्रिल या कालावधीत सुरू आहे. पुढील तिसरा टप्पा 2 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात येणार असून, अंतिम प्रशिक्षण 5 ते 7 मे या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये उर्वरित प्रगणक, पर्यवेक्षक तसेच राखीव व गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जनगणना अधिकारी शाम गोडळकर यांनी केले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कार्यालयीन कर्मचारी शाम सुदाम शिंदे व आतिफ तक्सीर शेख यांचीही उपस्थिती होती. जनगणना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
