• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा न्यायालया समोर सुरु असलेले काते कुटुंबाचे उपोषण मागे

ByMirror

Apr 28, 2026
ॲड. सुरेश लगड यांनी सोडविले उपोषण

ॲड. सुरेश लगड यांनी सोडविले उपोषण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या सेशन कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते यांनी आपल्या कुटुंबीयांसह जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण केले. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी उच्च न्यायालयात दाद मागून न्याय मिळवणार असल्याचे स्पष्ट करुन काते परिवाराचे उपोषण लिंबू पाणी देऊन सोडविले. यावेळी ॲड आनंद सुर्यवंशी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्यासह उपोषणकर्ते सुशिला काते, अनिता जाधव, रेखा भोगले, श्रद्धा काते, आराधना भोगले, अंकिता भोगले, राणी जाधव, सिताबाई रोकडे आदी उपस्थित होते.


काते यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते सामाजिक कार्यकर्ते असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम करतात. त्यांच्या मुलगा राजू साहेबराव काते याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर 2021 रोजी एका महिलेने भारतीय दंड विधान कलम 376, 452, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात 6 वे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी 12 मार्च 2026 रोजी राजू काते यास दोषी ठरवत 10 वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, हा निकाल वस्तुस्थितीचा योग्य विचार न करता देण्यात आल्याचा गंभीर आरोप काते यांनी केला आहे.

काते यांच्या मते, संबंधित महिलेने सुरुवातीला रुग्णालयात उपचारादरम्यान “अनोळखी व्यक्तीने अत्याचार केला” असे सांगितले होते, अशी नोंद वैद्यकीय कागदपत्रांत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने कथितरीत्या नाव बदलून राजू काते याच्यावर आरोप केला. यामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या प्रकरणातील डीएनए तपासणी अहवाल कायद्यानुसार 90 दिवसांत मिळणे अपेक्षित असताना तो सुमारे 14 महिन्यांनी सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, दोन्ही वेळच्या डीएनए अहवालात निष्कर्ष ‘निगेटिव्ह’ आले असतानाही न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष करून शिक्षा ठोठावली, असा आरोप काते यांनी केला आहे. या अन्यायाच्या विरोधात आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर कुटुंबीयांसह बेमुदत आमरण उपोषण करुन निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *